Padmalaya Ganpati Temple with two Swayambhu two Ganesha idols
श्री क्षेत्र पद्मालय (जळगाव) : नरेंद्र पाटील
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळील पद्मालय गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि प्रसिध्द गणेशस्थान आहे. याला सातपुडा पर्वतातील तपोभूमी, सप्तशृंगी गणपती किंवा दोनमुखी गणपती म्हणूनही ओळखले जाते.
येथील गणेशमूर्ती ही जगातील एकमेव दोनमुखी स्वयंभू मूर्ती आहेत.
एक मुख सिद्धीचे तर दुसरे बुद्धीचे प्रतीक मानले जाते. एकाच ठिकाणी उजव्या आणि डाव्या याप्रकारे दोघी सोंडेची गणपती मुर्ती विराजीत असून, गणपती मंदरापैकी हे एकमेव असे मंदिर आहे.
मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिरात विराजमान आहेत.
मंदिराच्या आवारात गणेशवृक्ष आहे, ज्याची पाने गणेशाच्या आकृतीसारखी दिसतात.
पौराणिक संदर्भ आणि आख्यायिकेनुसार प्राचीन काळी कश्यप व कपिल ऋषींनी येथे तप केल्यावर गणेश प्रकट झाल्याची कथा सांगितली जाते. तसेच महाभारतकालीन पांडवांनी अज्ञातवासात असताना येथे श्री गणेशाचे पूजन केले होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या क्षेत्राचा उल्लेख मुद्गल गणेश पुराणातही आढळतो.
मंदिर परिसरात सप्तकुंड आहेत. त्यातील भीमकुंड पांडवांशी संबंधित असल्याचे मानले जाते. आख्यायिकेनुसार, भीमाने गदेचा प्रहार करून हे कुंड निर्माण केले. येथे पांडव व बकासुर युध्द झाल्याची कथा लोकमान्य आहे. यात्रेकरू आजही या कुंडात स्नान करून त्यानंतरच गणपतीचे दर्शन घेतात.
मंदिरासमोर २५ फूट उंच दीपमाळ असून पूर्वी त्यात १०८ दिवे प्रज्वलित करत असे.
मंदिर उभारणीसाठी तब्बल नऊ वर्षे लागले असून १५० कारागीरांनी त्यासाठी आपले श्रम पणास लावले होते.
ऐतिहासिक असे धान्य दळण्यासाठी बनवलेले मोठे दगडी जाते आजही प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला पाहायला मिळेल.
पद्मालय गणपतीला विद्या, बुद्धी व सिद्धी प्रदान करणारा देव असे मानले जाते. या ठिकाणी गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी आणि भाद्रपदातील उत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात येथूनही भक्त मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. पद्मालय गणपती व भीमकुंड यामुळे हे स्थान केवळ धार्मिक श्रद्धेचे नव्हे तर प्राचीन इतिहास व पौराणिक परंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र मानले जात आहे.
जळगाव एरंडोल पारोळा येथून श्री क्षेत्र पद्मालय येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. एरंडोल येथून अनेक खाजगी वाहने देखील उपलब्ध असतात. जळगाव, धरणगाव आणि म्हसावद येथून सर्वाधिक जवळ असणारे रेल्वे स्थानक आहेत. तसेच विमानाने येण्यासाठी जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळ जवळ आहेत. श्री क्षेत्र पद्मालय प्रसिद्ध देवस्थान मानले जाते, त्यामुळे चतुर्थीला येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची मोठी गर्दी असते.