अमळनेर ( जळगाव ) : "वेळेची किंमत करणारा माणूसच वेळेच्या पुढे जातो. आम्ही अजित दादांना उगाच मानत नाही. त्यांच्या नेतृत्वाची धमक आणि प्रशासनावरची पकड पाहता, एक ना एक दिवस ते राज्याचे मुख्यमंत्री होणारच!" असे ठाम विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
अमळनेर येथे एका बँकेच्या शतकपूर्ती महोत्सवप्रसंगी बाबासाहेब पाटील बोलत होते. त्यांनी अजित पवार यांच्या कार्यक्षमतेची आणि कर्तृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. "दादा कधीही थकलेले, झोपलेले दिसत नाहीत. वेळेचे काटेकोर पालन करणारे आणि कामात झोकून देणारे नेतृत्व त्यांच्या ठिकाणी आहे," असे ते म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले, "गेल्या 40 वर्षांच्या राजकारणात अनेक नेत्यांशी संबंध आला, पण दादा यांच्यासारखी झपाटलेली व्यक्ती फार थोडीच. त्यांच्याकडून आम्ही 'जीव लावायचा' आणि कार्यकर्त्यांवर प्रेम करायचे खरे धडे शिकलो आहोत."
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त करताना, बाबासाहेब पाटील यांनी राज्यातील काही मंत्र्यांना नाव न घेता टोला देखील लगावला. "तुमच्या भागात सौरऊर्जेचं काहीच दिसत नाही, आमच्याकडे मात्र धिंगाणा चालू आहे," असे म्हणत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.