मुक्ताईनगर (जळगाव) : देशात महिला अत्याचारात वाढ होत असून महिला मोठ्या प्रमाणात असुक्षित आहेत. त्यामुळे महिलांना स्व- संरक्षणासाठी एक खून माफ करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. याबाबत खडसे राष्ट्रपती यांना पाठविलेले ऑनलाइन पत्र सोशल मडियावरही टाकले आहे.
खडसे यांनी पत्राच्या प्रारंभी राष्ट्रपती मुूर्मू यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतानाच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यात म्हटले की, आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांती, अहिंसेचे प्रतीक आहेत. त्यामुळे आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. आज देशात प्रत्येक दिवसागणिक अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. तसेच नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे यात जगातील विविध देशांमध्ये आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही यात समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खून माफ करा अशी समस्त महिलांच्या वतीने मागणी करत असल्याची म्हटले आहे.
पत्रात खडसे म्हणतात, आम्हाला खून करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आमची मागणी मान्य करा. हीच आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू असे सादही त्यांनी राष्ट्रपतींना घातली आहे.