जळगाव : "जीवनात कोणतेही मोठे कार्य संघाशिवाय शक्य नाही. ही संघभावना खेळातूनच आत्मसात होते," असे मत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी शाळेत C.I.S.C.E अंडर-17 राष्ट्रीय क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा 2025 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, असोसिएशनचे सदस्य अतुल जैन, शाळेच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, तसेच विविध क्रीडा व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सीआयएससीई ध्वज फडकवून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, सांस्कृतिक सादरीकरण आणि कलाकृती प्रदर्शन सादर केले. मशाल धाव पलक सुराणा हिने घेतली, तर राष्ट्रीय खेळाडू अन्मय जैन याने क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. खेळाडूंना शपथ मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल यांनी दिली.
रोहित पवार म्हणाले, भवरलालजी जैन आणि माझे आजोबा चांगले मित्र होते. त्यांनी संशोधनातून शेतीत क्रांती घडवली, तसेच आव्हानांवर मात करत यश मिळवण्याचा आदर्श दिला. खेळ हीच सकारात्मकता आणि आत्मविश्वास देतो.
13 संघ आणि 260 खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेत मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश-तेलंगणा, कर्नाटका-गोवा, महाराष्ट्र, उत्तराखंड, तामिळनाडू- अंदमान निकोबार, पश्चिम बंगाल, ओडिशा, वेस्ट इंडिया, नॉर्थ इंडिया, बिहार-झारखंड, केरळ, दुबई या १३ संघांचे सुमारे २६० खेळाडू सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे सामने अनुभूती इंटरनॅशनल स्कूल, जैन ड्रीम स्पेस (मेहरूण) आणि एमके स्पोर्ट्स (सावखेडा) या मैदानांवर खेळवले जात असून क्रिडाप्रेमींनी खेळाचा आनंद लूटण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची विजयी सलामी
‘ए’ गटातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडचा ५८ धावांनी पराभव केला. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १५ षटकांत १४५ धावा केल्या. उत्तराखंडचा संघ ८७ धावांत बाद झाला.
आदी लुंगानी याने ११ चेंडूंमध्ये २५ धावा करत व २ षटकांत फक्त ७ धावा देत एक गडी बाद करत "सामनावीर" पुरस्कार पटकावला. रोहित पवार यांच्या हस्ते आदी लुंगानी याचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धा गटानुसार रचना अशी...
गट A: महाराष्ट्र, उत्तराखंड, पोर्ट बेअर, ओव्हरसीस
गट B: ओडिशा, नॉर्थ वेस्ट, पश्चिम बंगाल
गट C: बिहार-झारखंड, तामिळनाडू-पोर्ट बेअर, मध्यप्रदेश
गट D: कर्नाटका-गोवा, नॉर्थ इंडिया, केरळ
प्रत्येक गटातील विजेता संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
उपांत्य फेरी:
गट A vs गट D
गट B vs गट C
विजेते संघ अंतिम फेरीस पात्र ठरतील.
उद्याचे सामने असे...
अनुभूती स्कूल आणि एमके स्पोर्ट्स मैदान येथे होणार आहेत.