नरेंद्र पाटील
जळगाव: जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला सर्वात मोठी डोकेदुखी निवडणूक ठरणार आहे. ज्या भाजपाच्या माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले त्यांनी अपक्ष म्हणून बंड पुकारले आहे. तर काहींना विजयाचे सूत्र म्हणून दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षात घेऊन तिकीट दिलेली आहेत. यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी नाराजीचे सूर लावलेले आहेत. अशात आमदार भोळे, आमदार मंगेश चव्हाण यांना कितपत यश येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जरी बिनविरोध निवडणुकीत भाजपा व शिवसेनेचे 12 उमेदवार विजयी झालेले असले तरी बहुमताचे गणित महायुतीला जमेल का व जनता त्यांना कौल देईल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
जळगावमध्ये महायुतीने विकासाचे व्हिजन जरी दाखवले तरी जळगावचा पाहिजे तसा विकास झाला आहे का? आज सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. एमआयडीसीमध्ये कोणत्याच मोठ्या कंपन्या नाहीत, त्यामुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. रस्त्यांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी धुळीचे साम्राज्य दिसून येत आहे. ज्या मेडिकल हबच्या गोष्टी होत आहेत, त्याचे काम कासवा पेक्षाही संथ सुरू आहे व ते शहरापासून लांब आहे त्यामुळे तेथे रुग्ण जाणार की रस्त्यातच जीव सोडणार अशी अवस्था झालेली आहे. जिथे काम चालू आहे तिथे अजूनही रस्ते झालेले नाही मग कशाला मेडिकल हबच्या गोष्टी करायच्या असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने विजयाचे गणित मांडलेले दिसून येत आहे. महायुती जरी असली तरी भाजपाने उद्धव बाळासाहेब ठाकरे मधून आयात केलेले माजी महापौर नितीन लड्डा, जयश्री महाजन, विरोधी पक्ष नेता सुनील महाजन, अमर जैन व ऐनवेळी उबाठाचे विजय बांदल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपाचे माजी नगरसेवक असलेले धीरज सोनवणे यांनी हाती मशाल घेतली. तर भाजपाने नाकारलेल्या उमेदवारीमध्ये जितेंद्र मराठे, प्रिय जोहरे, रंजना सपकाळे, चेतना चौधरी, सचिन पाटील, विजय पाटील यांनी आपली उमेदवारी अपक्ष म्हणून एक आव्हान उभे केलेले आहे. तर पियुष गांधी यांनी भाजपाचे नेतृत्व केले होते व माननीय नगरसेवक आहेत त्यांनी भाजपला रामराम करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. तर शिंदे सेनेचे ललित कोल्हे यांनी जेलमध्ये राहून आपली उमेदवारी दाखल केली आहे. या निवडणुकीत माजी महापौर, माजी उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख यांचे नशीब डावावर लागलेले आहे.
महायुतीने विजयाची घौडदोड करत12 नगरसेवक बिनविरोध उभे केले असले तरी महाद्वीतील बहुमत मिळेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. विकासाचे व्हिजन म्हणून जळगावमध्ये कोणता विकास झाला हा प्रश्न उपस्थित होत, रोजगाराचा प्रश्न आजही कायम आहे...रस्ते जे झाले आहेत त्यांचा दर्जा नागरिकांना अनुभवता येत आहे. काही ठिकाणी आजही धूळ माती आहे त्यामुळे सर्वसामान्यांना गरजेचे असलेले रस्ते, पाणी आणि ड्रनेज व्यवस्था या मूलभूत सुविधा अजूनही पाहिजे त्या स्वरूपात मिळत नाहीत. महानगरपालिकेच्या गाळेधारक याचा प्रश्न अजूनही कायम आहे. तो जरी सुटलेला दिसत असला तरी त्यावर अजून कोणतेच कायमस्वरूपी सोल्युशन निघालेले नाह, त्यामुळे निवडणूक किंवा निवडणुकीनंतर तो प्रश्न सुटेल का? असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
14 तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न करणार की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे व ते अपक्ष म्हणून उभे राहिल्यामुळे आम्हालाच फायदा आहे की ते मते खातील त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला फायदा होईल. राजकारणामध्ये सर्व एक झालेले आहेत कोण वजीर कोण प्यादा आणि कोण राजा सर्व डब्यामध्ये एकच आहे, असे मत आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केले आहे.