Nashik Crime  
जळगाव

Jalgaon Crime | शिक्षण क्षेत्राला काळिमा! नराधम शिक्षकाकडून चिमुकलीवर अत्याचार; पोलीस स्टेशनमध्ये मात्र 'व्हीआयपी' थाट?

धरणगाव हादरले: आरोपी शिक्षक नंदलाल मराठेला अटक; खुर्चीवर बसवल्याचा फोटो व्हायरल होताच पालकांचा संताप, मंत्री गुलाबराव पाटलांचा संबधित अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेत एका नराधम शिक्षकाने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. धरणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीतील चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नराधम शिक्षक नंदलाल मराठे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, अटकेनंतर पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीला खुर्ची देऊन 'व्हीआयपी ट्रीटमेंट' दिली जात असल्याचा फोटो समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

धरणगाव तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेत आरोपी नंदलाल मराठे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने शाळेतच चौथीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही बाब उघडकीस येताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर धरणगाव पोलिसांनी तात्काळ दखल घेत या नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या.

पोलिसांकडून आरोपीचे 'लाड'? फोटोमुळे खळबळ!

आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असतानाचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये हा नराधम चक्क खुर्चीवर बसलेला दिसत असून पोलीस त्याला सन्मानाने वागणूक देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. "चिमुकलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला जमिनीवर बसवण्याऐवजी खुर्ची कशासाठी?" असा सवाल संतप्त पालकांनी विचारला आहे.

पोलिस अधीक्षकांचे स्पष्टीकरण: "बीपी लो झाला म्हणून..."

व्हीआयपी ट्रीटमेंटच्या चर्चेवर जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "आरोपीचे ब्लड प्रेशर (रक्तदाब) कमी झाल्याने त्याला चक्कर आली होती. त्याला बरं वाटावं आणि तो खाली पडू नये म्हणून केवळ बसण्यासाठी खुर्ची दिली होती. कोणालाही व्हीआयपी वागणूक दिली जात नाही. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल केले जाईल," असे धिवरे यांनी स्पष्ट केले.

मंत्री गुलाबराव पाटील आक्रमक; निलंबनाचा इशारा

या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. "अशा नराधमाला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. जर पोलीस स्टेशनमध्ये त्याला खरंच व्हीआयपी वागणूक दिली गेली असेल, तर त्या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि संबंधित दोषी पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले जाईल," असा कडक इशारा मंत्री पाटील यांनी दिला आहे. बळीराजाच्या लेकीवर अत्याचार करणाऱ्या अशा विकृत शिक्षकाला कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आता धरणगाव तालुक्यातून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT