जळगाव : केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला असताना, जळगाव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या फलकावर मात्र अजूनही "ती" की "ति" या वेलांटीच्या वापरावर गोंधळ कायम आहे. समितीच्या नावात एकाच शब्दासाठी दोन वेगवेगळ्या वेलांट्यांचा वापर करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर "जिल्हा नियोजन समिती" असे बरोबर लिहिलेले असताना, इमारतीवर मात्र "ति" ला पहिली वेलांटी दिलेली आहे. त्यामुळे ही "ती" की "ति" या वेलांटीबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
राज्यात अनेक वेळा मराठीच्या सन्मानासाठी आंदोलन झाले आहेत. राज्य सरकारनेही मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेला मोठा सन्मान मिळाला आहे. मात्र, सरकारी कार्यालयातील अशा चुका पाहता हा दर्जा मिळाल्यानंतरही मराठीच्या व्याकरणाच्या अचूकतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
या गोंधळामुळे जिल्हा नियोजन समितीकडे येणारे नागरिक म्हणत आहेत की, “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असतानाही सरकारी यंत्रणेला अजूनही व्याकरण शिकायची गरज आहे.” मराठी भाषेच्या वापरात शुद्धता आणि सातत्य राखणे ही काळाची गरज आहे, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.