जळगाव

Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसे हे भाजपसाठी ‘अपशकुन’! काय म्हणाले महाजन

गिरीश महाजन : भाजपात आजही ‘नाथाभाऊंचीच’ मर्जी ?

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीतील पराभवानंतर जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंवर टीकेची झोड उठवत, त्यांना भाजपसाठी ‘अपशकुन’ ठरवले. या विधानामुळे भाजपातून बाहेर पडूनही खडसेंचा स्थानिक राजकारणावर प्रभाव कायम आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाजन म्हणाले, खडसे भाजपचे उमेदवार ठरवतात आणि त्यांच्याच मर्जीने त्यांना पाडतात. मुक्ताईनगरमधील पराभवाचे खापर त्यांनी थेट खडसेंवर फोडले. विशेष म्हणजे खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेत त्यांचा हस्तक्षेप कसा काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुक्ताईनगरच्या निकालाचे विश्लेषण करताना महाजन यांनी सांगितले की, खडसेंचे दुकान आता बंद झाले आहे. उत्तर महाराष्ट्र मीच, हा त्यांचा दावा फोल ठरला आहे, असे महाजन म्हणाले. एका घरात तीन पक्ष असून लोकांसमोर भाजपचा प्रचार केला जातो, हे मतदारांना पटत नाही. भुसावळात भाजपवर टीका करायची आणि मुक्ताईनगरमध्ये प्रचार करायचा, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.

रक्षा खडसेंबाबत इशारा आणि ‘अपशकुन’ अशी टिप्पणी

महाजन यांनी दावा केला की, खासदार रक्षा खडसेंना प्रचारात एकनाथ खडसेंना सहभागी करून न घेण्याचा सल्ला आधीच देण्यात आला होता. उभे केलेले उमेदवार मूळचे राष्ट्रवादीचे होते. त्यात भाजपचा एकही उमेदवार नव्हता. त्यामुळे पराभव अटळ होता. हा माणूस आमच्यासाठी अपशकुन ठरला, असे त्यांनी स्पष्टच सांगितले. तसेच, शरद पवार यांनी खडसेंना पक्षात का घेतले, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व

जिल्ह्यातील १८ पैकी १२ ठिकाणी भाजप तर ६ ठिकाणी शिंदे गटाचे नगराध्यक्ष निवडून आल्याने जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व असल्याचा दावा महाजन यांनी केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे जिल्ह्यात खातेही उघडणार नाही, असे मी आधीच सांगितले होते. हीच लाट आगामी महापालिका निवडणुकांमध्येही दिसेल, असा विश्वास महाtन यांनी व्यक्त केला.

महाजन यांच्या विधानांमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. खडसे राष्ट्रवादीत असतानाही भाजपमध्ये त्यांचा प्रभाव कायम आहे का, की स्थानिक पातळीवर उमेदवारी वाटपात आजही ‘खडसे फॅक्टर’ निर्णायक ठरतो, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT