जळगाव : राज्यात आणि केंद्रात विकासाची कास धरलेल्या सरकारचे 'व्हिजन' भुसावळ शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून भुसावळचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध असून, निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथे जाहीर प्रचार सभेत दिली. व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अमोल जावळे, जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, साधना महाजन, रंजना सावकारे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढील पाच वर्षांसाठी शहराची धुरा कोणाकडे द्यायची, हे मतदारांनी ठरवायचे आहे. 'आम्ही सकारात्मक दृष्टीने जनतेसमोर आलो आहोत. विकासाचा एक सविस्तर आराखडा तयार केला असून, तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शहरांचा विकास आणि साधण्याचे व्हिजन ठेवले आहे. हे व्हिजन आपल्या भुसावळपर्यंत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील साडेसहा कोटी जनता सुमारे ४०० शहरांमध्ये राहते. म्हणजेच जवळपास ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात आहे. यामुळेच शहरे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिल्याने ती बकाल झाली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाखो कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या असून, आता हळूहळू शहरे बदलू लागली आहेत. याच धर्तीवर भुसावळ शहरालाला विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
''मंत्री पत्नी' नव्हे, तर 'सर्वेक्षण महत्त्वाचे
मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याबाबत खुलासा करताना, ही उमेदवारी केवळ त्या मंत्र्यांच्या पत्नी आहे म्हणून दिली नाही तर पक्षाच्या अंतर्गत 'सर्वेक्षण'मध्ये त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्टीकरण यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
टेक्स्टाईल उद्योगाचे आश्वासन
मंत्री संजय सावकारे यांनी शहरात टेक्स्टाईल उद्योग नसल्याबद्दल खंत व्यक्त करत, पुढील जानेवारी महिन्यात नक्कीच एक टेक्स्टाईल उद्योग भुसावळमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही, असे वचन यावेळी दिले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपनगर परिसरात ८०० मेगावाॅटचा ऊर्जा प्रकल्प करण्याची मागणी मान्य केल्याचेही त्यांनी नमूद केले.