गिरीश महाजन- गुलाबराव पाटील Pudhari photo
जळगाव

Gulabrao Patil : ‘आधी आय लव यू तर म्हणू द्या’, जिल्हा बँक निवडणुकीवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिप्पणी

‘धर्मांतर खपवून घेणार नाही; सुमित पाटलांना अदृश्य शक्ती मदत करेल’

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : ‘‘जिल्हा बँक निवडणुकीत महायुती व्हावी, असाच आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. यापूर्वी नगरपालिका निवडणुकांमध्ये काही कुरघोडी झाली, काही ठिकाणी आम्ही एकत्र लढलो, तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात गेलो; पण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नक्कीच समन्वय साधून तोडगा काढू. त्यासाठी गिरीशभाऊंना आम्ही विनंती करू... पण आम्ही सर्व काही ठीक करू, आधी ‘आय लव यू’ तर म्हणू द्या,’’ अशा खास ग्रामीण शैलीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक समीकरणांपासून ते राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडली.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. यामागे एका ‘अदृश्य शक्ती’चा हात असल्याचा आरोप केला जात होता. यावर विचारणा केली असता गुलाबराव पाटलांनी व्यासपीठावर शेजारी बसलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाहत स्मितहास्य केले आणि "तीच अदृश्य शक्ती आता सुमित पाटलांना नक्की मदत करेल, अशी मला खात्री आहे," अशी मिश्किल टिप्पणी करत सभागृहात हशा पिकवला. तसेच जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत महायुती एकत्र लढण्याचे संकेत देत, या संदर्भातील सर्व अंतिम व योग्य निर्णय जिल्ह्याचे वरिष्ठ नेते गिरीश महाजनच घेतील, असे सांगून महायुतीमध्ये कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमधील कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना मंत्री पाटील यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली. "धर्मांतराचा प्रकार हा अत्यंत गंभीर असून तो कोणालाही मान्य असणारा नाही. यापूर्वी एरंडोल भागातही अशाच प्रकारे बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न काही जणांनी केला होता. कोणावरही जबरदस्ती करून धर्म बदलण्यास भाग पाडणे हा गंभीर गुन्हा आहे आणि अशा प्रवृत्तींना कुणीही पाठीशी घालू नये अथवा माफ करू नये. प्रत्येकाला आपापल्या धर्माचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे, मात्र जबरदस्तीचे धर्मांतर महाराष्ट्रात कदापि सहन केले जाणार नाही," असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांच्या सातत्यपूर्ण टीकेचा समाचार घेताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर थेट पलटवार केला. राऊत नेहमी इतरांवर बोट दाखवतात, परंतु त्यांनी स्वतः तुरुंगवासाचा अनुभव घेतलेला आहे. जर संजय राऊत यांना १०० दिवसांत जामीन मिळाला, तर त्यालाही त्यांनी मिळालेली क्लीन चिटच समजायची का, असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याचवेळी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत सदिच्छा व्यक्त केल्या. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असून त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी व ते पूर्णपणे बरे व्हावेत, यासाठी आपण ईश्वराच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे ते म्हणाले.

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी वास्तव परिस्थितीवर बोट ठेवले. राज्यात सध्या काही भागांत गंभीर दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी पुढील काळात उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, जनावरांच्या चाऱ्याचे योग्य नियोजन ठेवावे आणि काटकसरीने संकटाचा सामना करावा, असा कळकळीचा सल्ला त्यांनी दिला. त्याचबरोबर या कठीण काळात राज्य शासन पूर्ण ताकदीने आणि सर्वतोपरी बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT