जळगाव: शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी लांबवून पोलिसांना आव्हान देणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. काशिनाथ चौकातून चोरीला गेलेली 'सुपर स्प्लेंडर' हस्तगत करत पोलिसांनी दोन अट्टल चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील आरोपींमध्ये जळगावच्या कांचन नगरमधील एकाचा आणि भुसावळ तालुक्यातील साकेगावच्या एकाचा समावेश असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकी घटना काय?
जळगाव तालुक्यातील धानोरा खु येथील रहिवासी शालिक पाटील हे आपल्या मालकीची हिरोहोंडा सुपर स्प्लेंडर (MH-19-AK-0207) घेऊन काशिनाथ चौकात काही कामानिमित्त आले होते. वाहन पार्क करून ते सामान खरेदीसाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा (गु.र.नं. ६६/२०२६) दाखल करण्यात आला होता.
असा लागला चोरांचा सुगावा
गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोकों परमेश्वर जाधव व राजेंद्र पाटील यांच्या मोलाच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी आतिष जितेंद्र पोथीवाल (रा. कांचन नगर, जळगाव) याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
साथीदारासह साकेगाव कनेक्शन उघड
आतिषची कसून चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा साकेगाव (ता. भुसावळ) येथील त्याचा साथीदार गणेश लक्ष्मण कोळी याच्या मदतीने केल्याचे कबूल केले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गणेश कोळी यालाही बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली.
या पथकाने केली कारवाई
सदरची धडाकेबाज कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस अधिकारी राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, गणेश ठाकरे, राहुल घेटे आणि योगेश घुगे यांचा समावेश होता.