जळगाव : शहरात एकीकडे खड्यांचे साम्राज्य आणि दुसरीकडे व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी सुसाट धावणारी वाहने, या दुहेरी कात्रीत सोमवारी जळगावकर सापडले. भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस एस्कॉर्ट वाहनाने मेहरूण तलाव परिसरात एका प्रवासी रिक्षेला जोरदार धडक दिली. खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असून, यामध्ये चिमुरडीसह ७ ते ८ जण जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
भाजपचे खासदार मनोज तिवारी हे एका धार्मिक कार्यक्रमासाठी पारोळा येथे आले होते. तिवारी यांना 'वाय प्लस' सुरक्षा असल्याने जळगाव जिल्हा पोलिसांकडून त्यांना एस्कॉर्ट वाहन पुरवण्यात आले होते. कार्यक्रम आटोपून हे वाहन परतत असताना सोमवारी मेहरूण तलाव परिसरात हा अपघात झाला. शिरसोली रस्त्यावरील जीवघेणे खड्डे चुकवण्याच्या नादात पोलीस वाहनाचा वेग अनियंत्रित झाला आणि समोरून येणाऱ्या रिक्षेला (MH 19 V 6197) या वाहनाने जोरदार धडक दिली.
एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश
या भीषण धडकेत रिक्षेचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. जखमींमध्ये रिक्षाचालकासह महिला आणि एका ३ वर्षीय चिमुरडीचा समावेश आहे. जखमींची नावे खालीलप्रमाणे:
१. एकनाथ रामदास बारी (५०, रिक्षा चालक)
२. ज्योती एकनाथ बारी (४५, प्रकृती गंभीर)
३. रत्ना शंकर मिस्त्री (५०)
४. किर्ती शिवाजी बारी (४०)
५. अश्विनी शुभम कुमावत (२५)
६. प्रियांशी शुभम कुमावत (३ वर्षे)
७. सुशीला दिलीप बारी (५५)
८. कुणाल शिवाजी बारी (१३)
सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांची धाव, पण नागरिकांचा संताप कायम
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड आणि सपोनी गणेश वाघ यांनी पथकासह घटनास्थळ आणि रुग्णालय गाठले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शिरसोली रस्त्याची झालेली दैना आणि प्रशासनाचे याकडे असलेले दुर्लक्ष यामुळे सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. "व्हीआयपींच्या गाड्यांसाठी रस्ते मोकळे होतात, पण सामान्यांच्या जीवाचे काय?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
खड्ड्यांचा 'प्राणघातक' प्रवास कधी थांबणार?
जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे आता जिवावर उठू लागले आहेत. पोलीस प्रशासनाचे वाहन असूनही खड्यांमुळे नियंत्रण सुटत असेल, तर सामान्य वाहनधारकांची काय अवस्था होत असेल? या अपघाताने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या कारभाराचे धिंडवडे काढले आहेत.