जळगाव

Jalgaon theft news | हाताचा चावा घेत चोरट्यांनी फिल्मी' स्टाईलने लाखांचं मंगळसूत्र केलं लंपास

चाळीसगावात करगांव रोडवर थरार; राहुरीचा सराईत गुन्हेगार निष्पन्न, तिघे फरार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : चाळीसगाव शहरातील कॉलेज ग्राऊंड परिसरात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एका दाम्पत्याला अडवून त्यांच्यावर हल्ला करत १ लाख ५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी फिर्यादीच्या हाताचा चावा घेऊन त्यांना जखमी केले आणि पत्नीच्या गळ्यातील १५ ग्रॅमचे दागिने हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसंत शंकर पवार (वय ५५, रा. पारिजात नगर, धुळे रोड) हे २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पत्नी सोनल यांच्यासह दुचाकीने जात होते. कॉलेज ग्राऊंडजवळील हनुमान मंदिराजवळून करगांव रस्त्याने जात असताना, विना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या 'एफ झेड' (FZ) यामाहा मोटारसायकलवरून तिघे जण त्यांच्या जवळ आले.

अमानुष हल्ला आणि चोरी

यातील मुख्य आरोपी महेश बाळासाहेब जाधव (रा. मानोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याने त्याच्या दोन अनोळखी साथीदारांसह पवार दाम्पत्याला अडवले. प्रतिकार करत असताना आरोपीने वसंत पवार यांच्या हाताला जोरात चावा घेऊन त्यांना दुखापत केली. याच गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील १ लाख ५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची मिनी माळ (पोत) जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पळ काढला.

पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS) कलम ३०९(४), ३०४(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासाचे चक्र फिरले

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) शंकर मुटेकर हे करत आहेत. आरोपी महेश जाधव हा राहुरी तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलीस पथक त्याच्या आणि त्याच्या साथीदारांच्या मागावर आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

दुसऱ्या एका घटनेत वाईन शॉपचे शटर वाकवले, अन् अडीच लाखांचा गल्ला केला 'सप्फा'

जळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भजे गल्लीतील 'प्रिन्स वाईन शॉप'मध्ये चोरट्यांनी मध्यरात्री शटरचे पट्टे तोडून तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून, जिल्हापेठ पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गजबजलेल्या भजे गल्लीत प्रिन्स वाईन शॉप आहे. या दुकानाचे मॅनेजर श्रीराम रामचंद्र भोई यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाईन शॉपच्या लोखंडी शटरचे पट्टे कशाच्या तरी सहाय्याने तोडले. त्यानंतर दुकानात प्रवेश करून गल्ल्यात ठेवलेली २ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

५००, २०० च्या नोटांवर डल्ला

चोरट्यांनी गल्ल्यातील ५००, २००, १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या अशा विविध दराच्या नोटांची मोठी रक्कम लंपास केली आहे. सकाळी जेव्हा दुकान उघडण्यासाठी मॅनेजर आले, तेव्हा शटर तुटलेले दिसल्याने हा चोरीचा प्रकार उघड झाला. चोरीची ही पद्धत एखाद्या सराईत गुन्हेगाराची असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांची तत्परता; एकाला अटक

घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तातडीने शोधमोहीम राबवली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एका आरोपीला अटक केली असून, त्याचे इतर साथीदार कोण आहेत आणि ही रक्कम कुठे दडवली आहे, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(A) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT