Malnourished Children: चिंताजनक ! जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांच्या मतदारसंघातच कुपोषित बालके file photo
जळगाव

Malnourished Children: चिंताजनक ! जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांच्या मतदारसंघातच कुपोषित बालके

जळगाव जिल्ह्यातील ऑक्टोबर 2025 महिन्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी

पुढारी वृत्तसेवा

नरेंद्र पाटील, जळगाव

राज्यातील बालके कुपोषित राहू नयेत यासाठी शासन स्तरावर 'कुपोषण मुक्त महाराष्ट्र' सारख्या मोठ्या मोहिमा शासनस्तरावर राबिवल्या जात आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधी देखील खर्च केला जातो. मात्र, जळगाव जिल्ह्यातील ऑक्टोबर 2025 महिन्याची आकडेवारी पाहिली असता जिल्ह्यातील मंत्र्यांच्या आणि दिग्गजांच्या मतदारसंघातच बालके कुपोषित असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे संकटमोचक आणि अन्य बड्या नेत्यांच्या विधानसभा क्षेत्रातच कुपोषित बालकांची संख्येचे प्रमाण जास्त आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दर महिन्याला तालुका स्तरावर कुपोषणाची स्थिती तपासली जाते. ऑक्टोबर 2025 महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी 'तीव्र' (SAM) 676 आणि 'मध्यम' (MAM) 4,961 कुपोषित बालकांची संख्या असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये मध्यम' (MAM) कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे.

जळगाव जिल्ह्यामधील व राज्याचे संकटमोचक व आपत्ती व्यवस्थापन मंत्री असलेले गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये जामनेर एक, जामनेर दोन असे दोन भाग आहेत या दोन भागांमध्ये तीव्र (SAM) बालकांची संख्या 47 तर मध्यम (MAM) कुपोषित बालकांची संख्या 534 आहे. तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या धरणगाव तालुक्यात तीव्र (SAM) बालकांची संख्या 34 मध्यम (MAM) बालकांची संख्या 190 आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांच्या भुसावळ तालुक्यामध्ये 17 तीव्र (SAM) बालके असून 177 मध्यम (MAM) कुपोषित बालके असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेची जळगाव लोकसभा विभागाची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर देण्यात आली होती ते चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगाव तालुक्यातील विधानसभा क्षेत्रात चाळीसगाव एक व चाळीसगाव दोन असे दोन भाग असून यामध्ये तीव्र (SAM) कुपोषित बालकांची संख्या 96 वर आहे तर मध्यम (MAM) कुपोषित बालकांची संख्या 693 आहे. राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन मंत्री व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकमेव आमदार असलेले अनिल भाईदास पाटील यांच्या अमळनेर विधानसभा क्षेत्रात तीव्र (SAM) कुपोषित बालकांची संख्या 50 मध्यम (MAM) कुपोषित बालकांची संख्या 207 आहे.

रावेर लोकसभा क्षेत्रामधील सर्वाधिक लक्षवेधी असलेला विधानसभा क्षेत्र म्हणजे मुक्ताईनगर आहे. केंद्रीय राज्यमंत्री व माजी महसूल मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार एकनाथ खडसे व शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विधानसभा क्षेत्र असलेल्या मुक्ताईनगर मध्ये 30 तीव्र (SAM) कुपोषित बालके असून मध्यम (MAM) कुपोषित बालके 396 आहे. शिंदे सेनेचे आमदार असलेले किशोर आप्पा पाटील यांच्या पाचोरा मतदार संघात 54 तीव्र (SAM) कुपोषित बालके असून 284 मध्यम (MAM) कुपोषित बालके आहेत. रावेर लोकसभा क्षेत्र केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या लोकसभेत येणाऱ्या व रावेर, यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये रावेर एक व रावेर दोन, यावल या ठिकाणी कुपोषित बालकांची मोठी संख्या आहे व हा भाग आदिवासी बहुल आहे. यामध्ये रावेर एक व रावेर दोन मध्ये तीव्र (SAM) कुपोषित बालके 53 आणि मध्यम (MAM) कुपोषित बालके 372 आहेत. यावल या ठिकाणी 74 तीव्र (SAM) कुपोषित बालके असून मध्यम कुपोषित बालके 379 आहेत.

या भागात आदिवासी व ग्रामीण आदीवासी लोकसंख्या मोठी असल्याने कुपोषणाची समस्या अधिक तीव्र असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

पोषण पुनर्वसन केंद्राची स्थिती

जळगावमध्ये एनआरसी सेंटर मोहाडी येथे आहे. प्रत्येक तालुक्यात असे केंद्र असावे, अशी मागणी स्थानिक स्तरावर वाढत आहे. तीव्र कुपोषित बालकांना सुरुवातीला घरीच आहार दिला जातो. दोन आठवड्यांनंतरही सुधारणा न झाल्यास त्यांना एनआरसीमध्ये दाखल केले जाते. तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली 14 ते 21 दिवस उपचार केले जातात. ऑक्टोबरपर्यंत पाच मुलांना दाखल केले होते. त्यापैकी चार मुलांना सुधारणा झाल्यावर घरी सोडण्यात आले, अशी माहिती जळगाव जिल्हा परिषद, कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT