जळगाव : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध शस्त्र तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा चोपडा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे आणि धाराशिव येथील दोन आरोपींना ४ गावठी कट्टे आणि ८ जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि एका कर्मचाऱ्याने दाखवलेल्या धाडसामुळे हा शस्त्रसाठा गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याआधीच जप्त करण्यात यश आले आहे.
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पारउमर्टी हे गाव गावठी शस्त्र निर्मितीसाठी कुप्रसिद्ध आहे. येथून महाराष्ट्रात शस्त्र तस्करी रोखण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यातील उमर्टी आणि सत्रासेन परिसरात गेल्या एक महिन्यापासून २४ तास नाकाबंदी लावण्यात आली आहे.
शनिवारी (दि. २३) सत्रासेन नाका येथे पोलीस कर्मचारी रावसाहेब पाटील आणि घनश्याम पाटील हे नाकाबंदीवर तैनात असताना, त्यांना उमर्टीकडून एक दुचाकी वेगाने येताना दिसली. पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने गाडी वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील यांनी जीवाची पर्वा न करता धाव घेत आरोपींना शिताफीने पकडले, ज्यात ते दुचाकीसह खाली कोसळले.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वारांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आला. मंथन मोहन गायकवाड (वय २२, रा. हडपसर, पुणे): याच्या बॅगेत ३ गावठी कट्टे आणि ६ जिवंत काडतुसे सापडली. स्वप्निल विभीषण कोकाटे (वय ३२, रा. वाशी, जि. धाराशिव) याच्याकडे १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे मिळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल भवारी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याद्वारे सर्व शस्त्रसाठा जप्त केला.
पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी सांगितले की, त्यांचे साथीदार आप्पासाहेब गायकवाड आणि कानिफनाथ बहीरट हे धुळ्यात एका चारचाकी गाडीसह थांबले होते. या दोघांनीच आरोपींना शस्त्र आणण्यासाठी दुचाकी दिली होती. शस्त्रे मिळाल्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून सुरक्षितपणे पुढे नेण्याची योजना होती.
आरोपींनी हा शस्त्रसाठा उमर्टी येथील 'पाजी' नावाच्या एका व्यक्तीकडून ५० हजार रुपयांना खरेदी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या मंथन गायकवाडवर यापूर्वीही शस्त्र विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आता फरार आरोपींचा शोध घेत असून, हा शस्त्रसाठा नेमका कोणाला विकला जाणार होता, याचा तपास करत आहेत. या कारवाईमुळे जळगाव पोलिसांनी केवळ शस्त्रसाठाच जप्त केला नाही, तर पुणे आणि धाराशिवसारख्या शहरांमध्ये पोहोचण्यापूर्वीच संभाव्य गुन्हेगारी घटनांना मोठा आळा घातला आहे.