जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील श्री कपिल्लेश्वर महादेव मंदिराला 1100 वर्षे जुना इतिहास आहे. भारतामध्ये चार ठिकाणी श्री यंत्रावरील महादेवाची पिंड आहे त्यामधील महाराष्ट्रातील एकमेव मंदिर म्हणजे भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे गावातील आहे. आज या मंदिराची दूरवस्था झाली आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धार करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे.
या पुरातन हेमाडपंती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे शिवधनुष्य गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी पेलले असून, गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या यंदाच्या महाशिवरात्रीला येथे ५,५०१ पिढ्यांच्या पूजनाचा ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे.
११ व्या शतकातील हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामातील (हेमाडपंती) असून, याच्या भिंतीवर देवी-देवतांच्या कोरीव मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रशासकीय उदासीनतेमुळे या मंदिराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे
या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील 'पिंडी'. भारतातील केवळ मोजक्या चार ठिकाणी श्रीयंत्रावर शिवाची पिंडी असून, केरळ राज्यानंतर महाराष्ट्रात फक्त वेल्हाळे येथेच असा दुर्मिळ योग पाहायला मिळतो. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे थेट या पिंडीवर पडतात, जे स्थापत्यशास्त्राचा एक अद्भूत नमुना आहे.
आपल्या गावचा हा अमूल्य वारसा नष्ट होऊ नये, यासाठी गेल्या वर्षापासून गावातील तरुण आणि ग्रामस्थ एकवटले आहेत. सरकारी मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे
येत्या महाशिवरात्री निमित्त वेल्हाळे येथे अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ हजार ५०१ पिढ्यांचे एकाच वेळी पूजन करण्यात येणार असून हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.