जळगाव

"कोणती निवडणूक लढवायची आहे? वाईटपणा घ्या पण..."; पालकमंत्र्यांनी मुख्याधिकाऱ्यांना झापले

Jalgaon News | भुसावळच्या पाणीटंचाईवरून सावकार आक्रमक; जळगाव मनपा आयुक्त-महापौरांची बैठकीला दांडी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात उन्हाच्या झळांसोबतच आता पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी प्रशासकीय दिरंगाईचा पाढा वाचणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. "तुम्हाला कोणती निवडणूक लढवायची आहे? लोकांचे गळे कोरडे असताना नियम सांगू नका, वाईटपणा घ्या पण ५ दिवसाआड पाणी द्या," अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळच्या मुख्याधिकाऱ्यांना सुनावले. या बैठकीत जळगाव मनपाचे आयुक्त आणि महापौर अनुपस्थित होत्या.

'मुंबई'च्या ठेकेदारावर मनपा मेहेरबान ?

जळगाव शहरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर असताना उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले. एका मुंबईच्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊनही त्याने अद्याप काम सुरू केलेले नाही. विशेष म्हणजे, इतके दिवस उलटूनही मनपा प्रशासनाने त्याला साधी नोटीसही बजावलेली नाही. "ठेकेदार मुंबईचा असल्याने मनपा त्यावर मेहेरबान आहे का?" असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित झाला. आयुक्त मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले, तर महापौरांच्या अनुपस्थितीचीही चर्चा रंगली होती.

पाणी मंत्र्यांच्या गावातच टंचाई ?

शेंदुर्णीचे नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी गाडेगाव धरणातील अवैध उपशाचा मुद्दा मांडला. त्यावर पालकमंत्र्यांनी कोपरखळी मारली, "तुम्ही पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावचे आहात धरणातील सर्व अवैध मोटारींचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश दिले. "पुढील वर्षी पाऊस कमी पडण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे, त्यामुळे आतापासूनच पाण्याचे बाष्पीभवन रोखणे आणि काटकसर करणे गरजेचे आहे," असे आवाहनही त्यांनी केले.

'जल जीवन'चा फुगा सावकारांनी फोडला

भुसावळ तालुक्यातील 'जल जीवन मिशन'ची कामे १०० टक्के पूर्ण झाल्याचा अहवाल अधिकाऱ्यांनी सादर केला होता. मात्र, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी या अहवालाचा फुगा फोडला. "कोणत्या गावांची कामे पूर्ण झाली? फक्त एका ग्रामपंचायतीचा ठराव आला म्हणजे काम पूर्ण झाले असे होत नाही," अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना उघडे पाडले. यावर पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करत स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगून ४ आठवड्यात सविस्तर अहवाल मागवला आहे.

वीज वितरण कंपनीचा 'शॉक'

एरंडोल आणि चोपडा नगरपालिकेत सोलर प्लांट बसवूनही ते वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे कार्यान्वित झालेले नाहीत. रावेरमध्ये एक्सप्रेस फिडरची लांबी १२ किलोमीटर असल्याने पाणी वाटपात अडथळे येत आहेत. मुक्ताईनगर, वरणगाव आणि बोदवड येथे गेल्या चार महिन्यांपासून इंजिनिअर नसल्याने कामांचा बोजवारा उडाला आहे. हे सर्व प्रश्न ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे सक्त आदेश दिले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे :

  • बदलीचा फटका : मुक्ताईनगरचा इंजिनिअर नसल्याने मुक्ताईनगर नगरपालिकेच्या इंजिनिअरचा पदभार हा जामनेर नगरपालिकेच्या अभियंताकडे आहे मात्र गेल्या तीन महिन्यापासून त्यांनी मुक्ताईनगर नगरपरिषदेमध्ये भेटच दिले नाही सांगितले.

    जामनेरला गेल्याने तीन नगरपालिकांचे काम रखडले.

  • सक्त ताकीद : धरणात किंवा तलावात मोटारी टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा.

  • सोलर प्लांट : प्रशासकीय दिरंगाईमुळे कोट्यवधींचे सोलर प्लांट धूळ खात पडून.

  • या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल भाईदास पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, सीईओ कल्पना नायर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT