Madhya Pradesh Gang Held in Rajgad for Bank Reconnaissance 
जळगाव

Jalgaon Crime | बँकेतून रेकी करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला राजगडमधून ठोकल्या बेड्या

‘ऑपरेशन MP’ यशस्वी; ७७,५०० रुपयांच्या संपूर्ण रोकडसह आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार गजाआड

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : बँकेत आलेल्या ग्राहकावर पाळत ठेवून काही सेकंदात ७७ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या पाचोरा पोलिसांनी अक्षरशः मुसक्या आवळल्या आहेत. मध्यप्रदेशातील कुख्यात सांसी कडिया (जि. राजगड) या अतिसंवेदनशील भागात ‘ऑपरेशन MP’ राबवून पोलिसांनी स्थानिक गुन्हेगारांच्या अड्ड्यावर थेट छापा टाकला आणि रितीक राजाराम सिसोदिया या सराईताला बेड्या ठोकून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

बँकेपासून गॅरेजपर्यंत पाळत, अन् डाव साधला!

दि. १९ ऑगस्ट रोजी बनोटी (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकरी/व्यावसायिक दिनेश निलेश सोनवणे हे पाचोऱ्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे भरण्यासाठी आले होते. बँकेत तुफान गर्दी असल्याने ते कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील एका ऑटो गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीसाठी गेले. सोनवणे कामात व्यस्त असल्याचे पाहून दबा धरून बसलेल्या भामट्याने त्यांची ७७,५०० रुपयांची रोकड असलेली बॅग क्षणात लंपास केली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात BNS कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

सीसीटीव्हीत कैद झाली 'चाल', खाकीने काढला माग

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व डीवायएसपी बापू रोहोम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुन्हे शोध पथकाचे कॉन्स्टेबल हरीश परदेशी व सहकाऱ्यांनी बँकेसह परिसरातील डझनभर सीसीटीव्ही कॅमेरे पिंजून काढले. यात संशयित आरोपी बँकेपासून गॅरेजपर्यंत फिर्यादीचा पाठलाग करून ‘रेकी’ करत असल्याचे स्पष्ट दिसले. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या जाळ्यातून ही टोळी मध्यप्रदेशातील कुख्यात राजगड जिल्ह्यातील असल्याची पक्की खबर पोलिसांना लागली.

मध्यप्रदेशात धडक; रोख रकमेसह आरोपी जेरबंद

१ ऑक्टोबर रोजी पाचोरा पोलिसांचे विशेष पथक थेट मध्यप्रदेशात रवाना झाले. बोड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांसी कडिया या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गावात ३ ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाचोरा पोलिसांनी फिल्मी स्टाईल छापा टाकला. या कारवाईत रितीक राजाराम सिसोदिया याला ताब्यात घेण्यात आले. खाकीचा धाक दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण ७७,५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

ही धडक कामगिरी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी (तपास अंमलदार), पोलिस कॉन्स्टेबल हरीश परदेशी व पोलिस कॉन्स्टेबल श्रीराम शिंपी यांच्या पथकाने बजावली. आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्याने पाचोरा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT