Leopard pudhari
जळगाव

Jalgaon leopard rescue: मुक्ताईनगरात शासकीय विश्रामगृहात बिबट्याचा शिरकाव; २ तासांच्या थरारानंतर जेरबंद

मुक्ताईनगर शहरात रविवारी सकाळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा शासकीय विश्रामगृह (PWD Rest House) परिसरात एका बिबट्याने शिरकाव केल्याची घटना उघडकीस आली

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : मुक्ताईनगर शहरात रविवारी सकाळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा शासकीय विश्रामगृह (PWD Rest House) परिसरात एका बिबट्याने शिरकाव केल्याची घटना उघडकीस आली. सुरुवातीला वाघ आल्याची अफवा पसरली होती; मात्र तो सुमारे दोन वर्षांचा मादी बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत वनविभागाच्या पथकासोबत केलेल्या प्रयत्नांमुळे सुमारे दोन तासांच्या थरारानंतर बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले.

घटनेचा तपशील

रविवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास विश्रामगृह परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती वेगाने पसरली. आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी आणि काही कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम बिबट्याला पाहिले. त्यांनी तातडीने आमदारांना माहिती दिल्यानंतर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाला कळविले.

धाडसी रेस्क्यू ऑपरेशन

घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला. वनपरिक्षेत्र अधिकारी (मुक्ताईनगर) कु. कृपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक तत्परतेने कार्यरत झाले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः काठी हातात घेऊन रेस्क्यू पथकासोबत सहभाग घेतला. वनपाल गणेश गवळी यांनी अवघ्या पाच फुटांच्या अंतरावरून ट्रँक्विलायझर गनद्वारे बिबट्यावर अचूक डार्ट फायर केले. बेशुद्ध करण्याच्या प्रयत्नादरम्यान बिबट्याने काही वेळ चकवा देण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेरीस सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला यशस्वीरित्या पकडण्यात आले.

बिबट्या सुरक्षित

पकडल्यानंतर बिबट्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तो पूर्णपणे सुरक्षित व तंदुरुस्त असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे यांनी दिली. सध्या बिबट्या वनविभागाच्या ताब्यात आहे.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य

हे रेस्क्यू ऑपरेशन उपवनसंरक्षक (जळगाव) राम धोत्रे आणि सहाय्यक वनसंरक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी (वडोदा) परिमल साळुंखे, वनपाल गणेश गवळी, दीपश्री जाधव, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, सूरज बोराखडे तसेच पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत लोंढे आणि वनविभागातील कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

दरम्यान, मुक्ताईनगर परिसरातील सारोळा व मलकापूर रस्त्यालगतच्या शेतशिवारात अलीकडे आढळलेल्या वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मॉनिटरिंग सुरू असल्याची माहिती उपवनसंरक्षक राम धोत्रे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT