जळगाव (देवगाव) : जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात ७३ वर्षीय इंदुबाई वसंत पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या शेतात कपाशी निंदणीचे काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण असून हळहळ व्यक्त होत आहे.
इंदुबाई पाटील या देवगाव शिवारातील गट क्रमांक ५५ मधील आपल्या शेतात कपाशीची निंदणी करत होत्या. यावेळी झाडाच्या आशोशामध्ये लपून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर चावे घेतल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
घटनेच्या वेळी त्यांच्या शेजारी काम करत असलेले बाळू पुना पाटील आणि रमेश पौलाद सोनवणे यांनी ही दुर्घटना पाहिली आणि त्यांनी तत्काळ पोलीस पाटील रमेश पाटील यांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रमेश पाटील आणि त्यांचे चुलत भाऊ चंद्रकांत पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना आणि वनविभागाला माहिती दिली. इंदुबाई पाटील यांना उपचारासाठी तातडीने जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
गेल्या काही दिवसांपासून देवगाव शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याचे निदर्शनास आले होते. मात्र वनविभागाने अद्याप ठोस कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.