जळगाव : यावल तालुक्यातील किनगावजवळील साकळी जंगल परिसरातील शेतात आईचा हात धरून जात असलेला सात वर्षांचा बालक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला. आईच्या हातातून मुलाला बिबट्याने चक्क फरपटत ओढून नेले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल होत त्यांनी पंचनामा केला, तर दुसरीकडे चाळीसगाव कार्यालयाने चौकशी समिती नियुक्त केली आहे.
जळगाव वनविभाग कार्यक्षेत्रातील यावल येथील किनगाव साकळी परिसरात शेतकरी केतन सुरेश चौधरी यांचे शेत आहे. त्यांच्या शेताच्या आजुबाजूला जंगल आहे. गुरुवारी (दि. ६) दुपारी २ ते ३:३० च्या सुमारास केशा प्रेमा बारेला (७) हा आदिवासी मुलगा आपल्या आईसमवेत चौधरी यांच्या शेतात चालला होता. लगतच्या जंगलात लपलेल्या बिबट्याने झेप घेत आईच्या हातातून केशाला फरपटत ओढत नेले.
बिबट्याचा हल्ला होताच केशाच्या आईने केलेल्या आरडाओरडीने आजूबाजूच्या शेतातील शेतकरी धावले. शेतकरी धावत येताना पाहून बिबट्याने केशाला सोडून देत पळ काढला. परंतु केशाच्या गळ्याला बिबट्याने चावा घेतल्याने केशा जागीच गतप्राण झाला होता. त्याच्या छातीवर तसेच मांडीवर बिबट्याने पंज्याने ओरखडल्याने खोलवर जखमांमुळे रक्तस्राव झाला होता. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला देताच यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख तसेच सहायक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली. ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले.