Kumbhamela | सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी भुसावळ रेल्वे विभागाचे 'मेगा प्लॅनिंग'; नाशिक परिसरातील पाच स्थानकांचा १,६३० कोटींचा कायापालट! 
जळगाव

Kumbhamela | सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी भुसावळ रेल्वे विभागाचे 'मेगा प्लॅनिंग'; नाशिक परिसरातील पाच स्थानकांचा १,६३० कोटींचा कायापालट!

​देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे स्थानकांवर ९३ विकासकामांना वेग; स्वयंचलित सिग्नलिंगसह आधुनिक प्रवासी सुविधांची उभारणी

पुढारी वृत्तसेवा

​भुसावळ : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिककडे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने कंबर कसली आहे. नाशिक परिसरातील नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच प्रमुख रेल्वे स्थानकांवर तब्बल १,६३०.४३ कोटी रुपये खर्चाच्या ९३ मंजूर विकासकामांना युद्धपातळीवर गती देण्यात आली आहे. या कामांमुळे कुंभमेळ्यातील वाहतूक सुरळीत होण्यासोबतच नाशिककरांना भविष्यातही अत्याधुनिक रेल्वे सुविधांचा दीर्घकालीन लाभ मिळणार आहे.

​पाचही स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पूर्ण

रेल्वे परिचालनाची सुरक्षितता आणि वेग वाढविण्यासाठी पाचही स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. खेरवाडी व कसबे सुकेणे स्थानकांवरील यार्ड रीमॉडेलिंग आणि सिग्नलिंगचे काम ३० सप्टेंबर २०२६ रोजीच कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच कसबे सुकेणे, खेरवाडी आणि नाशिक रोड येथील पूल विस्तारीकरण पूर्ण झाले असून, ओढा व देवळाली येथे ९० टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) व वरिष्ठ अधिकारी या सर्व कामांचा नियमित आढावा घेत आहेत.

​स्थानकनिहाय कामांची सद्यस्थिती:

​नाशिक रोड : कुंभमेळा नियंत्रण टॉवरचे बांधकाम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वे ट्रॅकची कामे ५५ टक्के, फलाट कव्हर शेड ५० टक्के, तर १२ मीटर रुंदीच्या नवीन पादचारी पुलाचे (फुट ओव्हरब्रिज) काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. पूर्वेकडील बाजूला अतिरिक्त स्थानक इमारतीचे काम सुरू आहे.

​देवळाली : येथे १०० केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्यात आला आहे. ट्रॅकची कामे ६५ टक्के आणि फलाट विकासाची कामे ६० टक्के पूर्ण झाली असून पिट लाईन शेडचे काम प्रगतीपथावर आहे.

​ओढा : नियोजित ११ कि.मी. पैकी १०.१८ कि.मी. ट्रॅक लिंकिंग (९० टक्के काम) पूर्ण झाले आहे. फलाट बांधकाम ८० टक्के आणि कव्हर शेडचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे.

​खेरवाडी : या स्थानकावरील ट्रॅक सुधारणा, नूतनीकरण आणि टर्नआउट बदलण्याची सर्व कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत, तर पाण्याच्या टाकीचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.

​कसबे सुकेणे : पुलांच्या विस्तारीकरणाची सर्व ६ कामे पूर्ण झाली आहेत. फलाट शेडचे काम ८५ टक्के, फलाट बांधकाम ७५ टक्के आणि पादचारी पुलाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे.

​मनमाड-इगतपुरी मार्गावर 'ऑटोमॅटिक सिग्नलिंग'

रेल्वे गाड्यांची वारंवारता वाढवण्यासाठी मनमाड–इगतपुरी रेल्वे मार्गावर स्वयंचलित (ऑटोमॅटिक) सिग्नलिंग यंत्रणा बसवली जात आहे. यामध्ये खेरवाडी आणि कसबे सुकेणे स्थानकांचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. ओढा येथे ९३ टक्के, नाशिक रोड येथे ८० टक्के, तर देवळाली स्थानकावर ६८ टक्के काम पूर्ण झाले आहे. यासोबतच प्रवाशांसाठी स्वतंत्र होल्डिंग एरिया, स्वच्छतागृहे, संरक्षक भिंती आणि पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था उभारली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT