जळगाव : "वातावरण सुंदर करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करत आहेत. पण शाळा वाचवण्यासाठी शिक्षकांनीही मेहनत घेणे गरजेचे आहे. आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो, तसेच तुम्ही इंग्रजी माध्यमातील मुले फोडा आणि मराठी शाळांचे भविष्य उज्ज्वल करा," असे परखड मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" या संकल्पनेअंतर्गत तालुकास्तरीय विजेत्या शाळांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार (दि.12) रोजी जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजू मामा भोळे, शिक्षण अधिकारी विकास पाटील आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी शिक्षकांना उद्देशून सांगितले की, "आज हनुमान जयंती आहे. त्यामुळे हनुमानाची गदा घेऊन बाहेर पडा आणि विद्यार्थ्यांच्या मनातील 'राम' बना, जिथे मराठी शाळांची पटसंख्या वाढेल, त्या शाळेला आमदार निधीतून दहा लाख रुपये देण्यात येतील. शाळा वाचवायची असेल तर शिक्षकांनीही पटसंख्या वाढवण्यासाठी फिरावे लागेल."
"इंग्रजी बोलणे म्हणजे हुशारीचे लक्षण नाही. UPSC, MPSC व इतर राजस्व परीक्षांमध्ये मराठी विद्यार्थ्यांनीही यश मिळवले आहे. इंग्रजी म्हणजे सर्व काही नाही. प्रत्येक राज्याने आपल्या भाषेला महत्त्व दिले आहे," असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
"विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनीही ड्रेस कोड स्वेच्छेने स्वीकारावा. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुकरणाची भावना निर्माण होईल व शिक्षकांचाही आदर्श उभा राहील," असेही ते म्हणाले.
धरणगाव तालुक्यातील शिक्षक सोनवणे यांचे उदाहरण देत पालकमंत्री म्हणाले, "ते पंधरा वर्षांपासून एका ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची बदली झाल्यास ग्रामस्थ व विद्यार्थी मला घेऊन येतात. अशा शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे खरे संस्कार घडवले आहेत."
जळगाव ग्रामीणमधील शिक्षकांनी किमान दहा हजार विद्यार्थी दाखल करण्याचा संकल्प करावा. भविष्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशासाठी लोक आमच्याकडे पत्र घेण्यासाठी यावेत, अशी परिस्थिती निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असेही त्यांनी शिक्षकांना सांगितले.