जळगाव : जळगाव जिल्ह्यात ६ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेती व महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकूण 6390 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले असून, 7704 शेतकरी बाधित झाले आहेत.
बुधवार (दि.7) रोजी दुपारी जळगाव शहरात पुन्हा पावसाचे आगमन झाले. यावेळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे चाळीसगाव, जामनेर, भडगाव, पाचोरा, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, यावल, बोदवड व चोपडा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले. यात मका (253 हेक्टर), ज्वारी (77 हेक्टर), बाजरी (269 हेक्टर), भाजीपाला (84 हेक्टर), कांदा (242 हेक्टर), केळी (5111 हेक्टर), पपई (77 हेक्टर) व फळबागा (277 हेक्टर) यांचा समावेश आहे. विशेषतः केळी पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.
चाळीसगाव: 723 हेक्टर
जामनेर: 235 हेक्टर
भडगाव: 516 हेक्टर
पाचोरा: 28 हेक्टर
जळगाव: 3239 हेक्टर
रावेर: 579 हेक्टर
मुक्ताईनगर: 395 हेक्टर
यावल: 220 हेक्टर
बोदवड: 35 हेक्टर
चोपडा: 440 हेक्टर
पावसामुळे दहा दुधाळ जनावरे व तीन बैल वीज पडून मृत्युमुखी पडले. झाड पडल्याने जनावरांचेही नुकसान झाले. घरांच्या नुकसानीत 206 कच्ची घरे, एक अंशतः पक्के घर व चार झोपड्यांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका धरणगाव, पारोळा व रावेर तालुक्यांना बसला आहे.