जळगाव : जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीनचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील व नामदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अरविंद देशमुख, रोहित निकम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, "आता कोणाचं ऑपरेशन करण्याची गरज उरलेली नाही. पेशंट आपोआप आमच्याकडे येत आहेत." गिरीश महाजन यांनी या खात्याचे मंत्री असताना संपूर्ण यंत्रणेची माहिती घेतली होती, त्यामुळे आज रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटलं, "माझ्याविरुद्ध किंवा युतीच्या उमेदवारांविरुद्ध जे लोक लढले आहेत, त्यांना घेणे योग्य नाही. काहीजण पक्ष वाढवण्यासाठी येत नाहीत, तर आपल्याकडील नको असलेले दुसऱ्यावर ढकलण्यासाठी येतात. हे अजित पवारांना लवकरच कळेल की फायदा झाला की नुकसान."
अजित पवारांविषयी बोलताना ते म्हणाले, "त्यांना वाटतं की आता ते मुख्यमंत्री होणार, पण त्यांना वाट पाहावी लागेल."
संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं, "संजय राऊत हे शास्त्रज्ञ नाहीत की भविष्यवक्ता. त्यांचं बोलणं अर्थहीन आहे. ते पुन्हा खासदार होतील की नाही, हे त्यांनाच पहावं लागेल."
पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, "पंतप्रधान अर्धा दोरा सोडून आले, तरी कोणी काही बोलत नाही. पंतप्रधानांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर उपरोधितपणे बोलण्यासारखं आहे."