जळगाव : एरंडोल मध्ये कासोदा येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या अपघातात आठ जण भाजले गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर कासोदा येथे उपचार सुरू आहेत
कासोदा येथील शेतकरी अनिल पुना मराठे हे गढी भागात परिवारासह राहतात. रविवारी (दि.6) संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांनी गॅस सिलेंडर संपल्याने नवीन सिलेंडर आणले. मात्र सिलेंडर बसवल्यानंतर त्यातून अचानक गॅस गळती झाली. ज्यामुळे अचानक आग लागली. आगीच्या घटनेमुळे अनिल मराठे आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य घराबाहेर पळाले.
गॅस सिलेंडरचा स्फोटचा आवाज झाल्याने शेजाऱ्यांनी देखील त्वरीत धाव घेतली. या स्फोटामुळे ते देखील जोरात फेकले गेले. यामध्येच आठ जण भाजले गेले. यातील काही जखमींवर कासोदा तर काही जखमींवर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ज्ञानेश्वर देवराम पाटील (वय ४५), माधवराव शामराव गायकवाड (वय ३३) हे दोघे ४० टक्के भाजले गेले असून शुभम सुरेश खैरनार (वय २५), सुरेश अर्जुन खैरनार (वय ५०) या दोघांवर उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या खाजगी रुग्णालयात सागर कृष्णा सूर्यवंशी आणि आबा चव्हाण तर कासोदा येथील रुग्णालयात नगराज देवराम पाटील आणि घरमालक अनिल पुना मराठे यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान कासोदा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. यामध्ये घराचे व घरातील सामानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.