जळगाव : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणारी मंजूर कामे 31 मार्च च्या आत पूर्ण करून मंजूर निधी पूर्णपणे खर्च झाला पाहिजे यासाठी बांधकाम विभागाने 31 मार्च लक्षात घेऊन युद्ध पातळीवर कामे हाती घ्यावेत असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आयोजित बैठकीत दिल्या.
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या बांधकाम विभागाचे अभियंता व उपअभियंता यांची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी लोखंडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अलकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आधी यावेळी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर कामांचा आढावा घेतला. सद्यस्थितीत सुरू असलेली कामे मुदतीच्या आत पूर्ण करण्याची दक्षता घेण्यासोबतच , कार्यारंभ आदेश देऊन तात्काळ कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मंजूर कामांवर 31 मार्च पर्यंत निधी खर्च झाला पाहिजे कोणताही निधी परत जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्णय देखील यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी यावेळी दिले.