Jalgaon Police Tadipar Action Pudhari
जळगाव

Tadipar Action Jalgaon | रेल्वे प्रवाशांची लूट, महिलांशी असभ्य वर्तन; दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी तडीपार

यावल आणि भुसावळ परिसरात टोळी तयार करून सर्वसामान्य नागरिकांसह रेल्वे प्रवाशांमध्ये दहशत

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Police Tadipar Action

जळगाव : यावल आणि भुसावळ परिसरात टोळी तयार करून सर्वसामान्य नागरिकांसह रेल्वे प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. समशेर शहा सलीम शहा आणि समीर उर्फ भांजा रहेमान तडवी अशी हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये शनिवारी (दि. २८) हे आदेश जारी केले.

तडीपार करण्यात आलेला समशेर शहा सलीम शहा (वय २८, रा. बाहेरपुरा, चोपडा नाका, यावल) आणि समीर उर्फ भांजा रहेमान तडवी (वय २३, रा. तडवी कॉलनी, यावल) या दोघांनी यावल, भुसावळ शहरासह रेल्वे मार्गावर गुन्हेगारी कारवायांचा धुमाकूळ घातला होता. रेल्वे प्रवाशांचे मोबाईल आणि रोकड चोरणे, नागरिकांना अडवून जबरीने लुटणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, मारहाण आणि दमदाटी करून दहशत निर्माण करणे, असे गंभीर प्रकार त्यांच्याकडून घडले होते. या दोघांविरुद्ध लोहमार्ग भुसावळ, यावल आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यांत लूटमार, चोरी आणि विनयभंगाचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी यावल पोलिसांनी यापूर्वी दोघांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १२६ आणि १२९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यांच्या कारवायांमुळे नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

अखेर यावल पोलिसांनी दोघांना तडीपार करण्याचा प्रस्ताव सादर केला. फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश दिले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT