जळगाव: भुसावळ रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयी, सुरक्षितता आणि रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रवासी रनिंग लूप लाईन्सचे उन्नतीकरण हे एक निर्णायक टप्पे ठरले आहे. यामुळे रेल्वे वाहतूक कार्यक्षम होईल, प्रवासाचा कालावधी कमी होईल आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित व आरामदायक अनुभव मिळेल.
एप्रिल २०२५ मध्ये या प्रकल्पांतर्गत लासलगाव, नायडोंगरी, शिरसोली, वाघोदा, बोदवड व न्यू अमरावती या महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवासी रनिंग लूप लाईन्सचे उन्नतीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हे काम रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार, भारतीय रेल्वेच्या व्यापक पायाभूत सुविधा सुधारणा योजनेअंतर्गत पार पाडण्यात आले.
उन्नतीकरण दरम्यान विशेषतः दोन महत्त्वाच्या तांत्रिक बाबींवर भर देण्यात आला आहे.
ट्रॅक कुशन: प्रत्येक लूप लाईनखाली किमान १५० मिमी स्वच्छ गिट्टीचे कुशन घालण्यात आले, ज्यामुळे ट्रॅकची स्थिरता आणि टिकाऊपणा वाढला.
मशिन टॅम्पिंग: ट्रॅकची समांतरता आणि भूमिती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी मशीन टॅम्पिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
या सुधारणा पूर्ण झाल्यामुळे, घसरणीच्या घटनांमध्ये घट होईल, देखभालीची आवश्यकता कमी होईल, आणि प्रवास अधिक सुरळीत होईल. भुसावळ विभागात एकूण ६५ यार्ड्स आहेत. या सर्व ठिकाणी प्रवासी रनिंग लूप लाईन्सचे उन्नतीकरण डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.