जळगाव : जळगाव तालुक्यातील नांद्रा बु. व धरणगाव तालुक्यातील चांदसर या दोन गावांना जोडणारा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातून जात आहे. परिणामी येथील काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सद्यस्थितीतील रस्त्याचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
या रस्त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, शिक्षक दररोज श्री दत्त हायस्कूल, चांदसर येथे शिक्षणासाठी व शिकवणीसाठी ये-जा करतात. याशिवाय, नागरिकांना देखील दैनंदिन कामांसाठी हा मार्ग अत्यावश्यक आहे. नांद्रा बु. (ता. जळगाव) व चांदसर (ता. धरणगाव) दरम्यानचा हा ग्राममार्ग क्रमांक 102, जिल्हा परिषद योजनेअंतर्गत सन 2023-2024 मध्ये ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण योजनेतून मंजूर झाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी आपली जमीन मोकळी करून दिली असून सध्या काम प्रगतीपथावर आहे.
मात्र, गट क्रमांक २६/१ चे मालक नरेश भगवानदास नवाल आणि काही इतर शेतकरी यांनी रस्त्याच्या कामास विरोध केला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता प्रकल्प थांबलेला आहे. त्यांच्या विरोधामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर चांदसर ग्रामपंचायतीचे पत्र व नांद्रा ग्रामपंचायतीचा ठराव यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या संलग्न करून हे निवेदन प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे. दोन्ही गावांचे ग्रामस्थ, विद्यार्थी व नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे थांबलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.