जळगाव : पाणी न मिळालेल्या शेतकऱ्यांवर पाणी वापरल्याचा बोजा टाकण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दहा वर्षांपासून चाऱ्यांमधून पाणी मिळाले नसलेल्या गावांनाही पाण्याची बिले पाठवून आठ दिवसांत भरपाई करण्याचे नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पाणी वाटप संस्थेचे संचालक गिरधर पाटील यांनी दिली.
जिल्हा नियोजन भवन येथे जलसंपदा विभागाच्या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यादरम्यान गिरधर पाटील यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता यशवंत बदाने, तापी पाटबंधारे विभागाचे अभियंता बोरकर, विविध पाणी वाटप संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
हतनूर धरणातून यावल-रावेर भागातील शेतकऱ्यांना कालव्यांमार्फत पाणी पुरवले जाते. मात्र, अनेक कालवे व चाऱ्यांची दुरवस्था झाल्यामुळे सिंचन पूर्ण क्षमतेने होत नाही. काही ठिकाणी पाणी पोहोचते, तर काही गावांना अजूनही पाण्याचा थेंबही मिळालेला नाही.
राजोरा, बोरवेल, निमगाव या गावांत 8 ते 10 वर्षांपासून चाऱ्यांमधून पाणी सोडले गेलेले नाही. तरीही शेतकऱ्यांना पाणी वापरल्याचे बिले पाठवण्यात आले असून, आठ दिवसांत पाणीबिले न भरल्यास महसूल विभागामार्फत बोजा बसवण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
"हे सरकार लोकशाहीत असूनही इंग्रजांच्या काळातील पद्धती वापरत आहे," असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून चुकीचे बिले रद्द करण्याची मागणी केली आहे.
“शासन दरवर्षी आम्हाला वसुलीचे टार्गेट देते. आमच्यावर 56 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. यामुळे नियमानुसार शेतकऱ्यांना नोटीस पाठवली जाते. काही शेतकरी बिले भरतात, काही नाहीत. त्यामुळे पाणीबिलाबाबत लगेचच बोजा बसवला जात नाही.”आदिती कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, जळगाव.