जळगाव : नरेंद्र पाटील
जळगाव जिल्हा हा नेहमीच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रभावाखाली राहिलेला आहे. मात्र शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटफुटीनंतर स्थानिक पातळीवरील ताकद विभागली गेली आहे. सध्या शिवसेना शिंदे गट जिल्ह्यात मजबूत स्थितीत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातही शरद पवार गटातील नेत्यांचे इनकमिंग झाल्याने अनेक इच्छुक उमेदवार उभे राहण्यास सज्ज आहेत.
गेल्या निवडणुकांचा आढावा घेतल्यास रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने सर्वाधिक म्हणजे २२ जागांवर विजय मिळवला होता. याच भागात शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेसला ५, आणि काँग्रेसला ४ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे, जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी ११ व १२ जागांवर बाजी मारली होती, तर भाजपने फक्त ११ जागा मिळवल्या होत्या. काँग्रेसचे खाते उघडले नव्हते.
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ३३ जागा जिंकून आघाडी घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस १६ जागांवर, शिवसेना १४ जागांवर, आणि काँग्रेस ४ जागांवर विजयी झाली होती. याच काँग्रेसच्या चार जागांवर भिस्त ठेवत, 'संकटमोचक' ने भाजपला जिल्हा परिषदेत सत्तेवर आणले होते.
मात्र यंदा महायुतीमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांमध्ये जागावाटप हा मोठा मुद्दा ठरणार आहे. जागावाटप विधानसभेच्या समीकरणानुसार होणार की २०१७ च्या निकालानुसार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्याचे पालकमंत्री शिवसेनेचे असून ते 'संकटमोचक' म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे भाजपचेही मंत्री आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेतील जागांसाठी एकाच युतीतील या दोन मंत्र्यांमध्येच टक्कर होण्याची शक्यता आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना सर्वाधिक ताकदवान आहे, त्यानंतर भाजपचा क्रमांक लागतो. अजित पवार गटाचेही बळ यामध्ये आता सामील झाले आहे. रावेरमध्ये मात्र भाजपचा वरचष्मा आहे. त्यामुळे रावेरमध्ये शिवसेनेला महायुतीच्या मदतीची आवश्यकता भासू शकते, तर जळगावमध्ये भाजपने शिवसेनेला बरोबर घेणे अपरिहार्य ठरणार आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमधील पक्षांची स्थिती कमकुवत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नवीन जिल्हाध्यक्ष मिळाले असले तरी रावेर व जळगाव दोन्ही लोकसभा क्षेत्रात ते प्रभाव दाखवू शकलेले नाहीत. शरद पवार गटाची परिस्थितीही याच्याशी साधर्म्य राखते. काँग्रेसचे खाते उघडलेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी कितपत टिकेल, हा येत्या काळातील सर्वात मोठा प्रश्न ठरणार आहे.