जळगाव : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्याने अंगाची लाहीलाही करायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याचा पारा ४० अंशांच्या वर स्थिरावला असून, जळगाव जणू 'हॉट सिटी' बनली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी रस्ते ओस पडू लागले असून, नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.
तीन दिवसांचा तापदायक आलेख
हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जळगावमध्ये गेल्या ७२ तासांत तापमानाने चाळीशीची ओलांडलेली मर्यादा खाली येण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या सलग तीन दिवसांपासून ११ ते १३ मार्च बदलत्या हवामानामुळे आणि सूर्याच्या वाढत्या प्रखरतेमुळे मार्चमध्येच मे महिन्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
११ मार्च: कमाल तापमान ४०.३° अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, तर किमान १५.२° अंश इतके होते. ६१ टक्के आर्द्रतेमुळे उकाडा अधिकच जाणवला.
१२ मार्च: तापमानाचा पारा आणखी वाढून ४०.४° अंशांवर गेला. रात्रीचे तापमानही १५.६° अंशांवर स्थिरावले.
१३ मार्च: आजही सूर्याचा कोप कायम असून तापमान ४०.१° अंशांवर आहे. विशेष म्हणजे किमान तापमानात वाढ होऊन ते १७.२° अंशांवर पोहोचल्याने रात्रीचा गारवाही गायब झाला आहे.