Water crisis  Pudhari
जळगाव

जळगावचा घसा कोरडा! ३४ हजार तहानलेल्याना 'टँकर'चाच आधार

Jalgaon water crisis | ३१ विहिरी प्रशासनाने केल्या ' अधिग्रहण'

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : रणरणत्या उन्हाचा तडाखा वाढताच जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले आहेत. जिल्ह्यातील वाड्या-पाड्यांवर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली असून, अखेर प्रशासनाने ४ गावांची तहान भागवण्यासाठी ७ टँकर मैदानात उतरवले आहेत. तब्बल ३४ हजार ६०६ लोकसंख्येला पाणी पुरवण्यासाठी ३१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका सध्या भुसावळ आणि अमळनेर तालुक्याला बसताना दिसत आहे. भुसावळ तालुक्यातील एका गावा साठी १ टँकर, तर अमळनेर तालुक्यातील ३ गावांमध्ये ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, अमळनेरमध्ये पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे आहे.

३१ विहिरींचे 'अधिग्रहण'; पाहा कोणत्या तालुक्यात काय स्थिती?

जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये ३१ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

  • अमळनेर: १२ विहिरी

  • मुक्ताईनगर: ०९ विहिरी

  • जामनेर: ०४ विहिरी

  • पाचोरा: ०३ विहिरी

  • रावेर, चाळीसगाव, पारोळा: प्रत्येकी ०१ विहीर

गेल्या वर्षीच्या तुलनेत 'काहीसा' दिलासा!

गेल्या वर्षीच्या (७ मे) आकडेवारीवर नजर टाकली असता, यंदा टँकरची संख्या निम्मी असल्याचे दिसते. गेल्या वर्षी याच काळात १४ टँकर सुरू होते, ज्यात चाळीसगाव (६), अमळनेर (६), जामनेर (१) आणि भडगाव (१) या तालुक्यांचा समावेश होता. यंदा जामनेर आणि चाळीसगावमध्ये टँकरची गरज भासली नसली तरी विहिरींचे अधिग्रहण मात्र करावे लागले आहे.

प्रशासनाची कसरत, ग्रामस्थांचा टाहो

३४ हजारांहून अधिक लोकसंख्येला पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून कसरत सुरू असली, तरी मे महिन्याचे आगामी दिवस अधिक कठीण जाण्याची शक्यता आहे. भूजल पातळी घटल्याने अधिग्रहित विहिरी किती काळ साथ देतात, यावरच जिल्ह्याचे 'जल-भविष्य' अवलंबून आहे.

टंचाईचे ताजे रिपोर्ट कार्ड:

  • बाधित लोकसंख्या: ३४,६०६

  • एकूण टँकर: ०७

  • अधिग्रहित विहिरी: ३१

  • बाधित गावे: ०४

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT