जळगाव : पुढारी वृत्तसेवा – शहरात सध्या गोळीबार, खून याचे प्रमाण वाढलेले असताना वावरणे धोकादायक झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची आवश्यकता आहे. त्यासाठीच पोलीस प्रशासनाला गती याकरीता शहरात ठिकठिकाणी पोलीस चौकी निर्माण करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र जळगाव शहरातील शनिपेठ व इतर भागांमधील चौक्या दूर असताना येथील चौकीवर थेट खासगी वाहनधारकांनीच अतिक्रमण केलेले आहे. पोलीस चौकी परिसरात भंगाराचे सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून येते. काही दुकानदारांनी चौकीच्या आजूबाजूला दुकाने थाटलेली आहेत. त्यामुळे या पोलीस चौक्यांची पोलिसांनाच गरज नसल्याचे दिसून येत आहे. डिजिटल युगात सर्व कामे ऑनलाईन झाल्याने या पोलीस चौक्या पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कारभारातून बाद होताना दिसून येत आहेत.
पोलीस चौक्या दुरुस्ती व पुनर्बांधणीअभावी ओसाड पडल्या आहेत. शहरात सध्या गोळीबार, खून, चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना नागरिाकांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. गल्लीत हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलीस चौक्या नागरिकांच्या सोयीसाठीच उभारण्यात आल्या असताना पोलीस चौक्या वापराविना कचराकुंडी झालेल्या पहावयास मिळत आहे. या चौकीचे दारे, खिडक्या तुटलेल्या तर छत गळके झालेले आहे. आजूबाजूला भटक्या श्वानांनी हैदोस घातल्याने काही पोलीस चौकी भाेवताली सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असल्याने चौकात शहराच्या मध्यवर्ती किंवा चौफुलीवर महत्त्वाच्या जागी संवेदनशील भागात वेळोवेळी हजर असणे गरजेचे असताना या चौक्यांकडे कोणीही फिरकुनही पाहण्यास तयार नसतो. शनिपेठ भागातील बालाजी पेठ या चौकात असलेले पोलीस चौकीच्या आजूबाजूला खासगी वाहनांनी पार्किंग दिसून येत आहे. तर काही पोलीस चौकीच्या परिसरात बांधकामाचे डेबरेज, सिमेंटची पोती पडलेली आहेत. काही चौक्यांना कचराकुंडी व घाणीचे साम्राज्य झालेले आहेत. भिलपुरा चौकीच्या मागील बाजूस भंगारवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. डी मार्ट येथील पोलीस चौकीची देखील अशीच अवस्था झालेली आहे. शहरातील हाकेच्या अंतरावरील जवळपास सर्वच पोलीस चौक्या बंद झाल्या असल्याने नागरिकांना वेळप्रसंगी पोलीस ठाणे गाठावे लागत आहे. त्यामुळे सर्व कारभार जर या पोलीस ठाणे अंतर्गतच चालत असेल तर मग या पोलीस चौक्यांची आवश्यकता का आहे असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा: