जळगाव : जळगाव महापालिकेच्या 75 जागांसाठी गुरुवारी (दि.15) शहरात काही किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. सकाळी गुलाबी थंडीत मतदारांनी मतदान केंद्रावर येत मतदान केले. दरम्यान, निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू झालेला राजकीय राडा मतदानाच्या दिवशीही कायम राहिला. आर. आर. विद्यालयात बोगस मतदानावरून गदारोळ पाहायवास मिळाला, तर पिंप्राळ्यात भर दुपारी गोळीबार झाला यामुळे मतदानाला गालबोट लागले. शहरात सायंकाळपर्यंत सुमारे 50 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, अंतिम आकडेवारीनंतरच किती मतदान झाले हे स्पष्ट होणार आहे.
सुरुवात ‘कासव’गतीने सायंकाळी रांगा
शहरातील 321 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, प्रारंभी जळगावकरांनी मतदानाला थंड प्रतिसाद दिला. गेंदालाल मिल, तांबापुरा, मेहरून, हुडको आणि सुप्रीम कॉलनी या संवेदनशील भागात दुपारनंतर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.
पिंप्राळ्यात गोळीबार झाल्याने खळबळ
एकीकडे मतदान सुरू असतानाच पिंप्राळा परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या वादातून हवेत गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. या घटनेने पोलिस प्रशासन हादरले. यावेळी कापसे कुटुंबाच्या घरावर 200 ते 300 लोकांचा जमाव जमल्याची माहिती आचारसंहिता कक्षाला मिळाली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार नसल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.