जळगाव (कंडारी ) : तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 21 जून – जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे सादरीकरण केले तसेच इंग्रजी अक्षरांमधून ‘YOGA’ हा शब्द तयार करून अनोख्या पद्धतीने योग दिनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आल्यानंतर मानेच्या डाव्या-उजव्या हालचालींनी झाली. त्यानंतर खांदा, कमर आणि पायांच्या हालचालींचे प्रशिक्षण घेण्यात आले. शिक्षिका मंजुषा पाठक आणि ज्योती वाघ यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने करून घेतली.
कार्यक्रमात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन यांसारखी उभ्या स्थितीतील आसने, तसेच दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, शशांकासन, वक्रासन यांसारखी बैठक स्थितीतील आसने सादर करण्यात आली.
पोटावर झोपून केले जाणारे मकरासन, भुजंगासन, शलभासन तसेच पाठीवर झोपून सेतुबंध सर्वांगासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन आणि शवासनही विद्यार्थ्यांनी शिकले. यानंतर कपालभाती, नाडीशोधन, अनुलोम-विलोम व भ्रामरी प्राणायामाचे सत्र झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी ध्यान, संकल्प आणि शांतीपाठ घेण्यात आला. योगदिनाच्या विशेष सादरीकरणात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी अक्षरांचा वापर करून ‘YOGA’ हा शब्द तयार करून दृश्यरूपात सादर केला.
या उपक्रमात मुख्याध्यापक तुषार लोहार, राजाराम पाटील, सुनंदा रोझदकर, सविता निंभोरे, डॉ. जगदीश पाटील, विनोद जयकर, गणेश तांबे, शाम चिमणकर आदी शिक्षकांनी सक्रिय सहभाग व सहकार्य केले.