जळगाव: जिल्ह्यात आधीच कडक उन्हाचे चटके सहन करणाऱ्या बळीराजावर निसर्गाने पुन्हा एकदा वक्रदृष्टी केली आहे. गेल्या २३ आणि २४ मे रोजी जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील यावल, जामनेर, चोपडा आणि रावेर या चार तालुक्यांना या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला असून, तब्बल १ हजार ६६ पेक्षा अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जागच्या जागी भुईसपाट झाल्या असून, प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील १,७५० हून अधिक शेतकरी या अस्मानी संकटामुळे पूर्णपणे बाधित झाले आहेत.
२३ मे: पहिल्याच दिवशी यावल आणि जामनेरला फटका
२३ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे यावल आणि जामनेर या दोन तालुक्यांतील ८ गावांना वादळाने झोडपले. यात ४६ शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून २३.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यावल तालुका: तालुक्यातील ६ गावांमध्ये वादळाने धुमाकूळ घातला. यात २७ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. एकूण १२.३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, यात ९ हेक्टर केळी, १.८० हेक्टर लिंबू आणि १.५० हेक्टरवरील पपईच्या बागांचा समावेश आहे.
जामनेर तालुका: जामनेरमधील २ गावांना फटका बसला असून १९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येथील ११ हेक्टरवरील केळीचे पीक पूर्णपणे आडवे झाले आहे.
२४ मे: दुसऱ्या दिवशी अवकाळीचे तांडव; चोपडा अन् रावेर पुरते कोलमडले!
२३ मे रोजीची जखम ताजी असतानाच, २४ मे रोजी आलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात अक्षरशः तांडव केले. या दिवशी यावल, रावेर आणि चोपडा या तीन तालुक्यांतील ५१ गावांना वादळाने झोडपून काढले. अवघ्या एका दिवसात १,७०८ शेतकरी बाधित झाले असून, १०६६.६९ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.
चोपडा तालुका (सर्वाधिक नुकसान): २४ मे रोजी चोपड्याला निसर्गाचा भयानक मार सहन करावा लागला. तालुक्यातील २४ गावांमधील तब्बल १,४२२ शेतकरी बाधित झाले आहेत. येथे ८५० हेक्टरवरील केळी, २ हेक्टर पपई आणि १ हेक्टर इतर पिके असे एकूण ८५३ हेक्टरवरील पिकांचा पालापाचोळा झाला आहे.
यावल तालुका: दुसऱ्या दिवशीही यावलला दिलासा मिळाला नाही. २४ गावांमधील १६९ शेतकऱ्यांचे १३५.६९ हेक्टरवरील केळीचे पीक उद्ध्वस्त झाले.
रावेर तालुका: केळीचे आगार समजल्या जाणाऱ्या रावेरमधील ३ गावांत १०७ शेतकऱ्यांना फटका बसला असून ७८ हेक्टरवरील केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
नुकसानीची तीव्रता इतकी भीषण आहे की, जळगावचा मुख्य कणा असलेली केळीची शेती पूर्णपणे कोलमडली आहे. दोन्ही दिवसांचे मिळून एकूण नुकसान खालीलप्रमाणे आहे:
पिकाचा प्रकार. बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)मुख्य बाधित जिल्हे/तालुके
केळी १०८३.६९ हेक्टर
चोपडा, यावल, रावेर, जामनेर तालुक्यात
पपई ३.५० हेक्टर
चोपडा, यावल
लिंबू १.८० हेक्टर
यावल
इतर पिके १.०० हेक्टर
चोपडा
एकूण बाधित क्षेत्र. १०८९.९९ हेक्टर
जिल्ह्यातील एकूण ५९ गावे बाधित