जळगाव : तालुक्यातील ममुराबाद गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेतील अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.५ मे) रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत तरुणाचे नाव ऋषिकेश दिनेश पाटील (वय १८) असे आहे. तो ममुराबाद येथे आई-वडील, आजी आणि मोठ्या भावासोबत राहत होता. त्याने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. सोमवारी (दि.५ मे) दुपारी एक वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या निकालात त्याला केवळ ४९ टक्के गुण मिळाले, जे त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होते. त्यामुळे तो मानसिक तणावात गेला.
निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच दुपारी सोमवारी (दि.५ मे) दीडच्या सुमारास ऋषिकेशने घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोणी नसताना गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब आईच्या लक्षात येताच त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ऋषिकेशचे वडील शेतीकामासोबतच रसवंती गाडा चालवतात, तर मोठा भाऊ फार्मसी शिक्षण घेत आहे. त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या अशा अचानक जाण्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही शोककळा पसरली आहे.