Theft Case Pudhari
जळगाव

Jalgaon Burglary | जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या दोन घटना; २.८३ लाखांचा मुद्देमाल लंपास

मेहुणबारे येथे मध्यरात्री घरफोडी; ६१ हजारांचे दागिने चोरीला

पुढारी वृत्तसेवा

Theft Case Jalgaon

जळगाव : जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, जळगाव शहरातील रामानंदनगर आणि मेहुणबारे (ता. चाळीसगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. बंद घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ८३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

जळगावात बंद घर फोडून २.२२ लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव शहरातील त्र्यंबकनगर परिसरातील रहिवासी प्रकाश गजानन साखरे (वय ६४) हे १६ ते २१ ऑगस्टदरम्यान घराबाहेर गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख २५ हजार रुपयांची रोकड, असा एकूण २ लाख २२ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुरनं. २३३/२०२६ दाखल करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड तपास करीत आहेत.

मेहुणबारे येथे मध्यरात्री घरफोडी; ६१ हजारांचे दागिने चोरीला

दुसरी घटना मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथे घडली. निर्मला यशवंत महाजन (वय ४८, व्यवसाय शेती) यांच्या घरात २१ ऑगस्टच्या मध्यरात्री १.३० ते सकाळी ७.४५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. घराच्या दरवाज्याची कडी तोडून आत शिरलेल्या चोरट्याने कपाटात ठेवलेले ६१ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. यात नेकलेस, साखळी आणि सोन्याच्या तुकड्याचा समावेश आहे.

या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुरनं. २२९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नंदकिशोर महाजन तपास करीत आहेत.

दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून संशयितांचा तसेच चोरीच्या मुद्देमालाचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात एकाच कालावधीत घडलेल्या या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT