Jalgaon Students Space Agency Tour Pudhari
जळगाव

Jalgaon Students Isro Visit | विमानाने 'इस्रो'ची वारी, जळगावच्या आदिवासी पोरांची गरुडझेप

प्रकल्प कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Students Space Agency Tour

जळगाव : विज्ञानाची कास धरत अंधश्रद्धेला मूठमाती देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या १८ गुणवंत विद्यार्थ्यांनी थेट 'विमानात' बसून अहमदाबाद येथील 'इस्रो' (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) कडे झेप घेतली आहे. प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या या 'सुपर १८' विज्ञानाग्रहींसाठी २७ मे ते २९ मे २०२६ दरम्यान या विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

धरणगाव, रावेर, चोपडा आणि चाळीसगाव तालुक्यातील गरम, पिंपळे, बोरगाव, पाल, देवळी, मौल, चांदसर आणि लालमाती येथील आश्रमशाळांमधील या विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि. २७) जळगाव विमानतळावरून अहमदाबादसाठी उड्डाण केले. या ऐतिहासिक प्रवासापूर्वी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. "देशाचे विज्ञान कुठे आणि कसे प्रगतिशील झाले आहे, हे उघड्या डोळ्यांनी पहा आणि आपल्या ज्ञानात भर घाला," असा कानमंत्र जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

असे आहे नियोजन; पालकांनो वेळेवर हजर राहा!

या सहलीच्या नियोजनानुसार, निवड झालेले विद्यार्थी आणि ४ मार्गदर्शक शिक्षक २७ मे रोजी सकाळी ११ वाजता 'आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, दादावाडी, जळगाव' येथे एकत्र आले व तिथून विमानाने अहमदाबादला रवाना झाले. आता हा विज्ञान प्रवास आटोपून ३० मे २०२६ रोजी सकाळी ०७:०० वाजेपर्यंत हे विद्यार्थी पुन्हा जळगावच्या याच 'आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये परतणार आहेत.

संबंधित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी ३० मे रोजी सकाळी ७ वाजता वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सहलीसंदर्भातील अधिक माहितीसाठी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT