रावेर (जळगाव): रावेर-दोधे रस्त्यावर रविवार (दि.11) आज सकाळी तहसीलदार बंडू कापसे यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाळू वाहतूक करणारी एक ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉशआऊट मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
तहसीलदार कापसे यांच्यासोबत तलाठी स्वप्नील परदेशी आणि कर्मचारी भगत यांनी रावेरकडे येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींवर संयुक्त कारवाई करत वाळू जप्त केली. या अचानक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रावेर तालुक्यातील जागरूक नागरिकांनी याची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांनी सादर केलेल्या निवेदनात निष्क्रीय तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची तातडीने तालुक्याबाहेर बदली करण्याची मागणी केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, संबंधित भागातील काही तलाठी आणि मंडळ अधिकारी अवैध वाळू वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता, अनेक अधिकारी आपल्या जबाबदाऱ्यांप्रती गंभीर नसल्याची टीका होत आहे.