जळगाव : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील तरसोद ते चिखली या चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर दुचाकीस्वारांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र मार्गाची दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच येथे दुरुस्तीचे काम करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असताना पुन्हा रस्त्यावर भेगा पडल्याने ठेकेदारांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
टोल नाक्यावर दुचाकींसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला असला तरी तो अत्यंत अरुंद आहे. याच मार्गावर ड्रेनेजच्या झाकणाजवळ डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीटच्या जोडामध्ये मोठी भेग निर्माण झाली आहे. या भेगेत दुचाकीचे चाक अडकल्यास चालकाचा तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः शेजारच्या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू असल्याने अपघात झाल्यास जीवितहानी होण्याचा धोका अधिक आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी केवळ डांबर टाकून भेगा बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सततच्या वापरामुळे ते काम टिकले नाही आणि पुन्हा उंचवटे व भेगा निर्माण झाल्या आहेत. महिनाभरापूर्वी केलेले काम एवढ्या कमी कालावधीत निकृष्ट ठरत असेल तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई का होत नाही, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. तरसोद ते चिखली या राष्ट्रीय महामार्गावर दररोज हजारो दुचाकी व अवजड वाहने प्रवास करतात. या मार्गावर मोठ्या वाहनांकडून टोल वसूल केला जात असताना दुचाकीस्वारांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यात मात्र दुर्लक्ष होत असल्याची भावना वाहनधारकांमध्ये आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता अंकित दुबे यांच्याशी संपर्क साधला असता, “संबंधित ठिकाणी सुमारे एक महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. आता पुन्हा समस्या निर्माण झाल्याने आवश्यक दुरुस्ती करून घेतली जाईल,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजावर वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.