जळगाव : जिल्हा सांख्यिकी कार्यालयातर्फे शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-2024 तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी (DDO) अधिनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे जळगाव जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे सांख्यिकी अधिकारी समीर दि.भालेराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-0224 यामध्ये जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी (DDO) यांनी त्यांच्या अधिनस्थ असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची माहिती 1जुलै 2024 या संदर्भ दिनांकास अनुसरुन संगणकीय आज्ञावलीत भरुन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून तपासून घेणे अभिप्रेत आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयात आहरीत झालेल्या जुलै 2024 मधील वेतन देयकावरुन मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदांची आकडेवारी तसेच सेवार्थमधून Entry of post ची एक प्रत उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव यांना सादर करुन Login ID व Password घेवून जाणे आवश्यक आहे. तसेच EMDB 2024 ची माहिती भरताना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आय-डी अद्ययावत करावयाचा आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाद्वारा प्रथम प्रमाणपत्र उपलब्ध करुन घ्यावयाची आहे.
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाद्वारा प्रदान करण्यात आलेल्या प्रथम प्रमाणपत्रशिवाय संबंधित कार्यालयांचे माहे नोव्हेंबर 2024 (नोव्हेंबर 2024 पेड इन डिसेंबर 2024) चे वेतन देयक कोषागार कार्यालयातर्फे स्वीकारण्यात येणार नाहीत.
अधिनस्थ असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यास विलंब टाळण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी विहीत वेळेत प्रथम प्रमाणपत्र प्राप्त करुन घेत व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपली अचूक माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी संगणकीय आज्ञावलीत भरल्याची खात्री करून घ्यावी. असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.