National Highway No. 56
चौपदरीकरण करण्यात आलेला तरसोद ते चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर धोकादायक खड्डे निर्मा झाले आहेत. (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग झाले जीव घेणे

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भारत सरकारने राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले आहे. यामध्ये तरसोद ते चिखली हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 येथेही चौपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र जळगाव बायपास अजूनही पूर्ण न झाल्यामुळे जळगाव कडून भुसावळ कडे येताना वाहन चालकांना आपला जीव धोक्यात घालून राष्ट्रीय महामार्गावर यावे लागते तर भादली पुलावर खोल भागात पाणी साचत आहे. तर याच पुलावर रस्त्यावर रेती पडलेली आहे. याकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण जळगावचा संचालकांचे लक्ष नसल्याचे गंभीर बाब समोर येत आहे.

एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग हा सुकर बनवण्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने भारतभर सुरू केलेले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जो आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 झालेला असून त्याचे नुकतेच चौपदरीकरणाचे काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहेत. यामध्ये चिखली ते तरसोद हा मार्ग तयार करण्यात आलेला आहे. मात्र या मार्गांमधील अजूनही काही काम पावसाळा आला तरी अपूर्ण असल्याने रस्ते निसरडे होऊन संभाव्य धोका होण्याची शक्यता आहे.

जळगाव : पुलावरून एकाच बाजूने पादचारी नागरिकांसाठी दळणवळणाचा मार्ग सुरु करण्यात आलेला आहे.

यामध्ये भादली रेल्वे पुलावरील भुसावळ कडून जळगाव कडे येणाऱ्या पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे जळगाव, भुसावळ किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी व येण्यासाठी तसेच एकाच बाजूच्या पुलावरून नागरिकांचा दळणवळणाचा मार्ग सुरु आहे. तर याच पुलाच्या एका बाजूला खोल भाग निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत आहे. तर याच पुलावर भुसावळकडे येणाऱ्या बाजूने रेती पडलेली असून पादचाऱ्यांचा मार्गही येथेच तयार करण्यात आलेला आहे. तर रस्त्यावर पडलेल्या रेतीमुळे दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्ड्यातून वळण घेण्याच्या तयारीत असलेले चारचाकी वाहन.

जळगाव शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये जा करीत असल्याने ट्रॅफीक जॅम होत असल्याने काही ठिकाणी ओव्हर ब्रिज तयार करण्यात आलेले आहेत. मात्र शहराला वळसा घालून थेट पारधीला निघणारा बायपास रस्ता अजूनही अपूर्ण असल्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जळगाव कडून भुसावळकडे जातांना तरसोद गावाजवळून साईड रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताना मोठमोठी खड्डे पार करत जावे लागत आहे. तर रात्रीच्या वेळे स्ट्रिट लाईट बंद अवस्थेत असल्याने वाहनचालकांची खड्ड्यांमुळे त्रेधातिरपीट उडत आहे.

पावसाळा सुरू झालेला असून अद्यापही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या संचालक व कर्मचाऱ्यांना कठोर पावले उचलले नसल्याने वाहनचालकांना धोकादायक रस्त्यावरुन कसरत करत वाहने हाकावी लागत आहे.

याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता संबंधित अधिकारी हे व्हीसीमध्ये बिजी असल्याचे सांगण्यात येते. दुसऱ्या अधिकाऱ्याला भेटण्यास सांगितले जात आहे. तर दुसरे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. परिणामी वरिष्ठ अधिकारी कामाप्रती व्यस्त असल्याचे भासवून व्हिसी, मिटींग आदींमध्ये काम करण्याच्या पोकळ वार्ता करत असल्याने प्रत्यक्ष कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. वेळोवळी टोल पूर्ण घेतला जात असताना कामे मात्र वेळेवर पूर्ण होत नाहीत असा नागरिकांचा नाराजीचा सूर आहे.

SCROLL FOR NEXT