Tarsod Paldhi Bypass Closed Pudhari
जळगाव

Jalgaon Bypass | तरसोद–पाळधी बायपास पाचव्या दिवशीही बंद; दुरुस्तीला दिल्लीच्या पथकाची प्रतीक्षा

शहरातून अवजड वाहतूक सुरू; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

Tarsod Paldhi Bypass Closed

जळगाव : मुसळधार पावसामुळे तरसोद–पाळधी बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या (आरओबी) एका बाजूचा भराव व संरचनेचा काही भाग कोसळल्याच्या घटनेला पाच दिवस उलटले तरी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. दुरुस्तीसाठी केंद्रीय तांत्रिक पथकाची प्रतीक्षा असल्याने काम रखडले असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होत आहे.

३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे हा अपघात झाला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) नवी दिल्ली येथील तज्ज्ञ पथक पाहणीसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप या पथकाच्या दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नसल्याने प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकलेले नाही.

बायपास बंद असल्याने महामार्गावरील अवजड वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली आहे. परिणामी इच्छादेवी चौक ते तरसोद फाटा या मार्गावर विशेषतः सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे.

दरम्यान, तरसोद परिसरातील अंडरपास व उड्डाणपुलालगतच्या काही संरक्षक सिमेंट ब्लॉकचीही दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दिल्लीहून येणाऱ्या तांत्रिक पथकाच्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. पथक आल्यानंतर आवश्यक यंत्रसामग्रीसह पाहणी करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल. तसेच तांत्रिक अहवालानुसार संबंधित ठेकेदारावर आवश्यक ती कारवाई केली जाईल.
- साळुंखे, उपकार्यकारी संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT