जळगाव : नरेंद्र पाटील
जिल्ह्याचे राजकारण सध्या पाच पक्षांच्या त्रिकोणात फिरताना दिसत आहे. पूर्वीपर्यंत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एवढेच प्रमुख पक्ष होते, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट यामुळे आता एकूण पाच गट सक्रीय आहेत. या घडामोडींनी महानगरपालिका, नगरपालिका आणि मिनी मंत्रालयाच्या राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.
महानगरपालिकेतील भाजपचे 27 नगरसेवक तत्कालीन शिवसेनेने फोडून सत्तास्थापन केली होती. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता या 27 नगरसेवकांचे भवितव्य अधांतरीत आहे. त्यांना अपात्र ठरवले जाणार की पुन्हा संधी दिली जाणार, की ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परत जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या असल्या तरी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट अजूनही कोणतीही अधिकृत भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळे ही टांगती तलवार कधी खाली येणार आणि या नगरसेवकांचे भविष्य काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्हा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी या महानगरपालिकेवर सुरेश दादाजी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र नंतर भाजपने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यामुळे या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
पण शिवसेना दोन गटांत विभागल्यानंतर, या नगरसेवकांनी कोणत्या गटात सामील व्हावे यावर संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजप पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. शहरात विकासकामे वेगाने सुरू आहेत, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीची पकड सध्या कमकुवत असल्याचे चित्र आहे.
सर्वाधिक जागांवर दावा भाजपचाच राहील, हे निश्चित मानले जात आहे. परंतु तेव्हाच्या शिवसेनेत गेलेले २७ नगरसेवक अपात्रतेच्या तांत्रिक प्रश्नामुळे अजूनही अनिश्चिततेत आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की अपात्र ठरणार, हा प्रश्न ऐनवेळी समोर येईल.
भाजपच्या गोटात मात्र जुने, अनुभवी व विश्वसनीय कार्यकर्त्यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. दुसरीकडे, शिंदे गटाची रणनीती काय असणार आणि त्यांनी कोणाला उमेदवारी द्यायची हेही लवकर स्पष्ट होणे गरजेचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत, आणि हे अध्यक्षपद त्यांना भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्यामुळे मिळाले असल्याने त्यांचा कल महायुतीकडेच राहील, असे मानले जात आहे. त्यांनी आजवर महायुतीचा झेंडा उंचावलेला आहे, त्यामुळे ते महायुतीसोबत राहतात की भूमिका बदलतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) जागावाटप सर्वात मोठा मुद्दा ठरणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये (उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट) नव्या नेत्यांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे महायुतीतून नाकारले गेलेले नेते महाविकास आघाडीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.