Seven Lakh Cash Seized Jalgaon Pudhari
जळगाव

Cash Seized Jalgaon | सोन्याच्या बिस्किटांच्या संशयातून सापडली साडेसात लाखांची रोकड; बुलेट, आयफोनसह १०.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपड्याचे दोघे ताब्यात, ममुराबाद रोडवर मध्यरात्री वाहतूक पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Seven Lakh Cash Seized Jalgaon

जळगाव : सोन्याची बिस्किटे घेऊन त्यांचे पार्सल करण्याच्या तयारीत काही जण असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या पथकाने ममुराबाद रोडवर मध्यरात्री नाकाबंदी केली. यावेळी बुलेटवरून जाणाऱ्या चोपडा तालुक्यातील दोन तरुणांना अडवून झडती घेतली असता, त्यांच्याकडे ७ लाख ५२ हजार १२० रुपयांची रोकड आढळून आली. या रकमेबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने पोलिसांनी रोकड, बुलेट मोटारसायकल आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण १० लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासह नाकाबंदी प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक मोरेश्वर पेंडाम यांना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात नाकाबंदी सुरू असताना सोन्याची बिस्किटे घेऊन काही जण पार्सल करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे निरीक्षक पेंडाम यांनी पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रहिम बेग आणि मंगल नथ्थू साळुंखे यांना कारवाईसाठी पाठविले.

१६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.२० वाजण्याच्या सुमारास ममुराबाद रोडवर एमएच १९ ईयू १८८४ क्रमांकाच्या बुलेटवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अडविले. चौकशीत त्यांची नावे हरीष राजेंद्र महाजन (वय ३०) आणि सुजित गोकुळ महाजन (वय २६, दोघे रा. मंदिरा, अडावद, ता. चोपडा) अशी असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडील हिरवट करड्या रंगाच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळले.

या रोकडबाबत विचारणा केली असता दोघांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक रहीम रज्जाक शेख यांनी पंचांसमक्ष पंचनामा करून ७ लाख ५२ हजार १२० रुपयांची रोकड जप्त केली. यामध्ये १०० रुपयांच्या पाच हजार नोटा (५ लाख रुपये), ५०० रुपयांच्या ५०० नोटा (२ लाख ५० हजार रुपये) आणि अंगझडतीत मिळालेल्या २ हजार १२० रुपयांचा समावेश आहे.

याशिवाय २ लाख ५० हजार रुपये किमतीची बुलेट, ६५ हजार रुपयांचा आयफोन आणि २८ हजार रुपयांचा विवो मोबाईल असा एकूण १० लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा क्रमांक ९८७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंडाम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT