Bribe Pudhari
जळगाव

Jalgaon Bribe Case : सातबाऱ्यावर बोअरवेलची नोंद करण्यासाठी लाच; तलाठी जाळ्यात

एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीची कारवाई; यावल तालुक्यातील आमोदा येथील तलाठ्यावर गुन्ह्याची प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : सातबारा उताऱ्यावर बोअरवेलची नोंद करण्यासाठी आणि त्याचा उतारा देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना यावल तालुक्यातील आमोदा येथील तलाठ्याला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. मंगळवारी (६ ऑक्टोबर) आमोदा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तलाठी शैलेश अंकुश झोटे (वय ३८, वर्ग-३, मूळ रा. मेहकर, जि. बुलढाणा, सध्या रा. रावेर, जि. जळगाव) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांची सध्या यावल तालुक्यातील आमोदा सजा येथे तलाठी म्हणून नियुक्ती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात सिंचनासाठी बोअरवेल घेतली आहे. शासनाच्या सोलर सिस्टीम योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उताऱ्यावर बोअरवेलची नोंद असणे आवश्यक असल्याने ते तलाठी झोटे यांच्याकडे गेले होते. त्यावेळी नोंद करण्यासाठी झोटे यांनी चार हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी ३,५०० रुपये त्यांनी यापूर्वीच घेतले होते.

दरम्यान, तक्रारदार २ ऑक्टोबर रोजी कामाची विचारणा करण्यासाठी पुन्हा तलाठ्याकडे गेले. त्यावेळी उर्वरित ५०० रुपये तसेच सातबारा उतारा देण्यासाठी आणखी ५०० रुपये, अशी एकूण एक हजार रुपयांची लाच झोटे यांनी मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर तक्रारदाराने ६ ऑक्टोबर रोजी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात आली. यावेळी तलाठी झोटे यांनी यापूर्वी ३,५०० रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित एक हजार रुपयांची मागणी केली आणि रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शविली.

त्यानुसार एसीबीच्या पथकाने आमोदा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी शैलेश झोटे यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपी तलाठ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुनील वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील यांनी ही कारवाई यशस्वी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT