जळगाव : जळगाव रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी (दि.12) रोजी सकाळी एक बेवारस वाहन आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे या वाहनामधून सातत्याने ‘बीप’चा आवाज येत असल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि शहर पोलिसांनी तातडीने परिसर रिकामा करत, बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले. मात्र, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
सध्या देशभरात युद्धजन्य परिस्थितीचे सावट असताना अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये थोडा जरी आवाज झाला तरी भीतीचे वातावरण आहे. परंतु वाहनातून येणारा बीप आवाज आणि वाहनाची बेवारस स्थितीमुळे सुरक्षा यंत्रणेने तातडीने खबरदारी घेतली. बॉम्ब शोध पथकाने वाहनाची संपूर्ण तपासणी करून दरवाजा उघडला असता कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाहन एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे असून त्या काही कारणास्तव बाहेरगावी गेल्या होत्या. त्यांनी वाहन रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंगमध्ये उभी केली होती. विशेष म्हणजे वाहनाच्या पुढील नंबर प्लेटही नव्हती, तर मागील बाजूस एमएच 12 एसएफ 1680 हा क्रमांक आढळून आला. तपासणीनंतर वाहनातून बीपचा आवाज तांत्रिक कारणामुळे येत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. तरीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण वाहनाची कसून तपासणी करण्यात आली.
संबंधित वाहन नो पार्किंगमध्ये उभे केल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी तात्काळ फोनद्वारे संवाद साधला. वाहनामध्ये कोणतेही संशयास्पद साहित्य न आढळल्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नागरिकांनी अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.